आदर्शगाव हिवरेबाजारची गौणखनिज वाहतूक, सपाटीकरणासाठी नियमावली
नगर : आदर्शगाव हिवरे बाजारच्या ग्रामसभेत जमीन सपाटीकरण, (सुधारणा) गौणखनिज उत्खनन व वाहतूक यासाठी नवीन नियमावली तयार करण्यात आली. त्यानुसार माती व गौणखनिजची वाहतूक ट्रॅक्टरद्वारेच करण्याचा, रस्ते खराब होत असल्यामुळे डंपरचा वापर न करण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच उत्खनन करताना जल, मृद व वनसंवर्धनाच्या कामांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे.
आदर्शगाव हिवरेबाजारची ग्रामसभा महाराष्ट्र दिनी आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे राज्य कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी सरपंच विमल ठाणगे, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार उमेश पाटील उपस्थित होते. ग्रामसभेत नवीन नियमावलीची माहिती देण्यात आली. हिवरेबाजारमधील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील सुधारणा (सपाटीकरण) करण्यासाठी काळी माती व इतर गौणखनिज वाहतुकीच्या दृष्टीने सोईस्कर होण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली. त्यानुसार वाहतूक, सपाटीकरण करताना ट्रॅक्टरचाच वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. जड वाहतुकीमुळे रस्ते खराब होतात त्यामुळे डंपरचा वापर केला जाणार नाही तसेच यापूर्वी गावात जलसंधारण, मृदसंधारण व वनसंवर्धनाचे काम करण्यात आले, त्याचे नुकसान होणार नाही व या कामांच्या ‘स्ट्रक्चर्स’चे नुकसान होणार नाही याची दक्षता नियमावलीद्वारे घेण्यात आली आहे.
नवीन घराचे बांधकाम किंवा रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ही अट शिथिल करण्यात आली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी परवानगीसाठी अर्ज केल्यास ग्रामपंचायतीने आठवडाभरात परवानगी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. सात दिवसांत परवानगी न मिळाल्यास, परवानगी आहे असे समजून काम करण्यास हरकत नाही असे समजण्यात येईल. हिवरेबाजारमधील घरपट्टीची फेरआकारणीही केले जाणार आहे. त्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. गावातील व वडजूबाई माता व गणेश मंदिर चौपाळा या मंदिरांचे अपूर्ण काम मुंबादेवी यात्रा लिलावाच्या रकमेतून, दोन लाख ९० हजारांतून पूर्ण करण्याचे ठरले. गावातील शिवार वाहतुकीचे रस्ते, बांध, जमिनीचे पोटहिस्से यामुळे गावोगाव वाद होतात.
गेली ३० वर्षे गावातील तंटे गावपातळीवरच मिटवले जात होते. परंतु गेल्या वर्षी, ३५ वर्षांनंतर प्रथमच हिवरेबाजार ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. त्याला राजकीय वळण लागू नये म्हणून गावात वाद झाल्यास प्रथम पोलीस स्टेशनला नोंद करून, त्यानंतर दोन्ही बाजूंना वाटले की तडजोड करून मिटवायचा आहे, तर गावच्या तंटामुक्ती समिती पुढे हा वाद मिटवण्यात येणार आहे.
कृषी पंप सौरऊर्जेवर व शुद्ध पाणी ‘एटीएम’द्वारे
भविष्यातील वीजटंचाई लक्षात घेऊन हिवरेबाजारमधील कृषी पंप सौरऊर्जेवर चालवण्याचा प्रकल्प राबवला जाणार आहे. त्याबद्दल पद्मश्री पवार यांनी ग्रामसभेत सविस्तर माहिती दिली. याशिवाय गावातील प्रत्येक कुटुंबाला शुद्ध व स्वच्छ पाणी ‘एटीएम’द्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.