सातारा : कोणत्याही निवडणुका जवळ आल्या की माझ्यावर विनाकारण आरोप केले जात आहेत. मला बदनाम करण्यासाठी माझ्यावर ७० हजार कोटींचा आरोप झाला होता. पण काहीही सापडले नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
रहिमतपूर(कोरेगाव )येथे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, शहाजी क्षीरसागर आणि संभाजीराव गायकवाड यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रवेशानिमित्त भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
मी पवार असल्याने माझ्यावर निवडणुकीच्या काळात व इतर वेळी विनाकारण आरोप केले जातात. माझ्यावर आरोप करणे सहज सोपे असते. परंतु त्यातून समाजात गैरसमज पसरविले जातात. माझ्यावर झालेल्या कोणत्याही आरोपात तथ्य नाही. एका प्रकरणात माझ्या नातेवाइकाच्या घरी छापे टाकण्यात आले. काही सापडले नाही. परंतु प्रचंड त्रास सहन करावा लागला, असेही पवार म्हणाले.
रहिमतपूर येथील माजी नगराध्यक्ष सुनील माने यांचा पक्षप्रवेश नाही, ती घरवापसी आहे. जनतेची कामे करण्यासाठी सत्ता आवश्यक असते. विरोधी पक्षात असताना आंदोलन आणि उपोषण करता येतात, पण जनतेची कामे सत्तेतूनच पूर्ण होतात. आम्ही भाजपसोबत गेलो आहोत, पण शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाही याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
पार्थ पवार यांच्या प्रकरणावर म्हणाले, मला या घटनेची पूर्वमाहिती नव्हती. एक रुपया कुणाला दिला नाही, घेतला नाही, मग व्यवहार झाला कसा, चौकशीसाठी कमिटी बसली आहे, लवकरच सर्व माहिती समोर येईल. माझ्यावर विनाकारण आरोप केले जात आहेत. जनतेचे काम करणाऱ्यांवरच आरोप होतात. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यासाठी ४० हजार कोटी रुपये खर्च झाले. रहिमतपूरच्या विकासासाठी सुनील माने कमी पडणार नाहीत. कारण त्यांच्या पाठीशी मी स्वतः आहे. जनतेने त्यांना साथ द्यावी. या सभेला मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
पक्षप्रवेशामुळे ताकद वाढली
आजच्या पक्षप्रवेशामुळे सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद नक्कीच वाढली असून, येत्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचं यश दिसून येईल, असा विश्वास आहे. आपण कामाची माणसं आहोत, जनसेवेतून आपलं काम दिसून आलं पाहिजे. त्यामुळे येत्या काळातही आपण सर्वांनी एकजुटीनं आणि जबाबदारीनं पक्षाची विकासाभिमुख विचारधारा घरोघरी पोहोचवण्यासाठी आणि पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहावं, असं आवाहन त्यांनी केलं. सत्तेत आल्यानंतर अनेक जनकल्याणकारी योजना राबविल्या. केंद्राकडून निधी आणून विकासाची घोडदौड सुरू आहे.
