ED on Bitcoin scam: महाराष्ट्रात आज विधानसभेचे मतदान पार पडत असताना बिटकॉइन घोटाळा समोर आला आहे. पुण्यातील माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी निवडणुकीत परकीय चलन वापरल्याचा आणि आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉइनचा वापर केल्याचा आरोप केला होता. तसेच भाजपाचे खासदार, प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही मंगळवारी रात्री पत्रकार परिषद घेऊन कॉल रेकॉर्डिंग्स व व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सचे स्क्रीनशॉट प्रसिद्ध केले होते. सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्या कथित आवाजातील ऑडिओ क्लिपही समोर आली होती. आता या प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. सुप्रिया सुळे यांच्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ज्या गौरव मेहताचा उल्लेख झाला. त्याच्या रायपुर मधील घरी ईडीने धाड टाकली आहे. २०१८ साली झालेल्या क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी धाड टाकल्याचे सांगण्यात आले.

माजी आयपीएस अधिकारी रविंद्र पाटील यांनी २०१८ च्या क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यात गौरव मेहता हा प्रमुख आरोपी असल्याचे म्हटले होते. गौरव मेहता हा एका ऑडिट फर्मचा कन्सलटन्ट असून पुणे पोलीस ६,६०० कोटींच्या क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याप्रकरणी त्याची चौकशी करणार आहे. रविंद्र पाटील यांनी दावा केला की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गौरव मेहताला फोन करून क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यातील रक्कम निवडणुकीच्या कामासाठी मागितली होती.

हे वाचा >> “तो आवाज माझ्या बहिणीचा…”, बिटकॉइन स्कॅमवर अजित पवारांचा धक्कादायक आरोप

रविंद्र पाटील यांनी आरोप केला की, सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांनी २०१८ च्या बिटकॉइन घोटाळ्याचा गैरवापर केला असून या घोटाळ्यातील पैशांचा वापर महाराष्ट्रातील निवडणुकांसाठी केला.

सुप्रिया सुळेंनी आरोप फेटाळले

दरम्यान, सुप्रिया सुळेंनी आज सकाळी मतदानानंतर माध्यमांशी बोलताना या आरोपांवर उत्तर दिलं आहे. “एकतर काल संध्याकाळी मला माध्यमांमधून कळलं की असे आरोप झाले आहेत. माझ्या हातात ते व्हॉइस रेकॉर्डिंग आल्यानंतर मी पहिली गोष्ट केली ती म्हणजे पुण्याच्या पोलीस आयुक्तांना अर्थात अमितेश कुमार यांना फोन केला. मी त्यांना सांगितलं की काही बनावट रेकॉर्डिंग फिरत आहेत आणि मला सायबर क्राईमकडे तक्रार करायची आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही तक्रार करा. मी काल संध्याकाळीच ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे की या सगळ्या रेकॉर्डिंग्ज आणि मेसेजेस खोटे आहेत”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

शरद पवार काय म्हणाले?

दरम्यान शरद पवार यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “जी व्यक्ती काही महिने तुरुंगात होती, त्याची नोंद तरी कशी घ्यायची? माझ्या मते त्याची नोंदही घ्यायची आवश्यकता नाही”, असं म्हणत शरद पवारांनी भाजपावरही निशाणा साधलाय. ते म्हणाले, “असे आरोप करून भाजपा किती खालच्या पातळीवर जाऊ शकते याचं हे उदाहरण आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुधांशु त्रिवेदींविरोधात मानहानीचा दावा

दरम्यान, भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांविरोधात आपण मानहानीचा दावा केल्याचंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं. “आज सकाळी मी सुधांशु त्रिवेदींना मानहानीची नोटीस पाठवली आहे. त्यांनी मला पाच प्रश्न केले आहेत. त्यावर त्यांनी मला आव्हान दिलं की बाहेर येऊन उत्तर द्यावं. मी बाहेर येऊन उत्तर द्यायला कधीही तयार आहे. सुधांशु त्रिवेदी ज्या शहरात, ज्या चॅनलवर, ज्या वेळी मला बोलवतील, त्या वेळी मी जाऊन उत्तर देईन. त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर माझं उत्तर असेल ‘नाही’. सगळे आरोप खोटे आहेत. त्यामुळेच मी सायबर क्राईमकडे तक्रार केली आहे आणि नंतर मी अवमान याचिका दाखल केली आहे”, असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.