बारामाती अॅग्रो कारखान्यात झालेल्या कथित गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांची आज (२४ जानेवारी) सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) तब्बल ११ तास चौकशी झाली. ११ तास ईडीला सहकार्य केल्यानंतर रोहित पवारांनी राष्ट्रवादी भवनच्या खिडकीतून उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केलं. तसंच, त्यानंतर पत्रकारांशीही संवाद साधला. “ही लढाई संपलेली नसून अशीच सुरू राहणार असल्याचं”, ते यावेळी म्हणाले.
ईडीकडून ११ तास चौकशी झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. त्यावेळी रोहित पवार म्हणाले, ही लढाई संपलेली नाही. ही लढाई पुढेही अशीच सुरू राहणार आहे. त्यामुळे माझ्यासाठी तब्बल १२ तास येथे जमललेल्या माझ्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो.
“८४ वयाच्या युवारोबर आपण एकजुटीने लढत आहोत. असे असंख्य हजोर नागरिक, कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात येण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी अडवलं असेल. पण काही हरकत नाही. सर्व प्रेमानेच येथे येत होते. मी सहकार्य करत होतो, सहकार्य करत राहणार आहे. अधिकाऱ्यांची चूक नसते. त्यांनी जे विचारलं ते दिलं आहे. यापुढेही सहकार्य असंच राहील. तिथं जेव्हा सहकार्य करत होतो, १२ तास चौकशी चालू होती. अनेक लोक थकतात, घाबरतात, कळत नाही काय करायचं. पण तिथे बसलो होतो तुमच्या सर्वांचा आवाज माझ्या कानापर्यंत पोहोचत होता. माझ्या प्रेमापोटी येथे येऊन घोषणा देत होतात, लढत होतात. हे माझ्या कानावर येत होते. त्यातून मला प्रेरणा मिळत होती”, असं रोहित पवार म्हणाले.
“तुम्हाला एक गोष्ट जाणवली का. जेव्हा एखादा कार्यकर्ता अडचणीत येतो, आपल्या विचारांचा आमदार अडचणीत येतो, त्याच्यावर अन्याय होतो, असं लाडक्या नेत्याला कळालं तेव्हा शरद पवार १२ तास बसले. यावरून सर्वांनी समजून घ्या. पवार साहेब एखाद्याला संधी देऊ शकतात. जेव्हा तो अडचणीत येतो तेव्हा बापमाणूस म्हणून त्याच्यामागे भक्कमपणे उभे राहतात. मराठी माणसं लढत असतात. त्यामुळे पळणाऱ्याच्या मागे राहत नाहीत तर लढणाऱ्यांच्या मागे ते उभे राहतात”, असंही ते म्हणाले.
पुन्हा एक तारखेला चौकशी
आज ११ तासांची चौकशी झाल्यानंतर रोहित पवारांना पुन्हा १ फेब्रुवारी रोजी चौकशीकरता बोलावण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. या चौकशीकरता ईडीकडून अतिरिक्तम माहिती मागवण्यात आली आहे. ही अतिरिक्त माहिती दिली जाणार आहे, असं रोहित पवार म्हणाले. ते म्हणाले, मी आधी व्यवसायात आलो. नंतर राजकारणात आलो. जो व्यवसाय केला तो प्रामाणिकपणे केला. काही लोक आधी राजकारणात आले, मग व्यवासायात आले. आम्ही कधी त्यांना प्रश्न केला नाही. मग त्यांनी आम्हाला का प्रश्न विचारावा असा माझा त्यांना प्रश्न आहे, असंही रोहित पवार म्हणाले.