पत्राचाळ घोटाळा प्रकरणी पीएमएलए न्यायालयाने शिवसेना खासदार संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. राऊतांपाठोपाठ त्यांची पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स बजावले आहे. ६ ऑगस्ट म्हणजे आज वर्षा राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत.

हेही वाचा- “उद्धव ठाकरे १५ दिवसांत देणार होते राजीनामा,” दीपक केसरकरांच्या दाव्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “तीन पक्ष…”

सर्व व्यवहार वर्षा राऊत यांच्या नावावर झाले असल्याचा आरोप

पत्राचाळ गैरव्यवहार असो की अलिबागमधील जमिनीचे व्यवहार असो हे सर्व व्यवहार वर्षा राऊत यांच्या नावावर झाले आहेत, असा आरोप ईडीने केलाय. त्यांनी याबाबत सेशन्स कोर्टातही कागदपत्रं सादर केली. आता वर्षा राऊत यांच्या खात्यावर अनोळखी लोकांकडून आलेल्या पैशांच्या व्यवहाराची चौकशी होणार आहे. त्यामुळे वर्षा राऊत यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे.

हेही वाचा- “उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदी बसवू” संजय राऊतांचे बंधू सुनिल राऊतांचे विधान

यापूर्वीही वेगळ्या प्रकरणासाठी करण्यात आली होती चौकशी

दरम्यान, वर्षा राऊत यांची आधीही ४ जानेवारीला ईडीने चौकशी केली होती. ती चौकशी पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित होती. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या खात्यात काही व्यवहार झाले. त्याबाबतचा तपशील जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना नोटीस पाठवली होती. ईडीच्या नोटीशीनंतर राऊत यांनी चौकशीसाठी वेळ वाढवून मागितली होती.