राज्यात भाजपा-शिंदे या नव्या सरकारवर आज शिक्कामोर्तब झाला आहे. कारण, या सरकारने आज विधीमंडळात विश्वासदर्शक ठराव जिंकला. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनपर भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच, ईडीच्या भीतीमुळे शिवसेनेच मंत्री, आमदार हे भाजपासोबत गेले असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून बोललं जात असल्याने, त्याला देखील फडणवीसांनी आपल्या भाषणातून प्रत्युत्तर दिलं.
फडणवीस म्हणाले, “मला असं वाटतं की आपण सगळे राजकीय विरोधक आहोत शत्रू नाही. मगाशी काहीजण ईडी.. ईडी असं ओरडत होते. हे खरंच आहे, ही मंडळी ईडीमुळेच आली आहे. फक्त ती ईडी एकनाथ आणि देवेंद्र आहेत. राजकारणात दोन्ही बाजू असतात. आम्या एका-एका नेत्यांवर ३०-३० खटले टाकले होते. हनुमान चालीसा म्हटली की घर तोडणार. मी तर सांगितलं की मी नशीबवान आहे. मी रोज सरकारच्या विरोधात बोललो तरी माझं घर तोडायला संधीच नव्हती, कारण मुंबईत माझं घरच नाही. मी सरकारी घरातच राहतो आणि नागपूरमध्ये जे घर आहे ते पूर्ण नियमात आहे.”
तसेच, “एखादी राजकीय पोस्ट टाकल्यानंतर पंधरा दिवस, महिनाभर लोक तुरूंगात आहेत. आपण कुठल्या लोकशाहीबद्दल बोलत आहोत. इकडे मात्र सांगायचं की दिल्लीत तानाशाही सुरू आहे. या पेक्षा वेगळी तानाशाही काय असू शकते. एक-एक महिना तुम्ही तुरुंगात ठेवता आहात. ते हनुमान चालीसा वाचतो म्हणाले, हनुमान चालीसा वाचण्याचा कार्यक्रम मागे घेतला. तरी महिला खासदार १२ दिवस तुरुंगात. मला असं वाटतं की यावर स्वतंत्र चर्चा करू. दोन्ही बाजूकडच्या व्यथा आहेत. प्रयत्न असा केला पाहिजे की दोन्हीकडच्या ज्या व्यथा आहेत, त्या दूर केल्या पाहिजेत.” असंही यावेळी फडणवीसांनी बोलून दाखवलं.