एकनाथ खडसेंचा वाढदिवस आणि जयंत पाटलांचं आगळंवेगळं गिफ्ट…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचा आज वाढदिवस असून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी त्यांना एक आगळंवेगळं गिफ्ट दिले आहे

Eknath Khadse birthday
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचा आज वाढदिवस आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचा आज वाढदिवस असून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी त्यांना एक आगळंवेगळं गिफ्ट दिले आहे. तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या जळगाव जिल्ह्यातील वरणगांव तळवेल परिसर सिंचन योजनेंतर्गत आज ओझरखेड धरणात पाणी सोडण्यात आले यामुळे जळगाव जिल्ह्यातील बोधवड, मुक्ताईनगर, भुसावळ या तालुक्यातील ५२ गावांना या योजनेचा लाभ होणार आहे.

दरम्यान या कार्यक्रमात व्हर्च्युअल माध्यमातून जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सहभागी झाले होते. वरणगांव तळवेल परिसर सिंचन योजनेत, हातनूर धरणातून पावसाचे वाहून जाणारे पाणी लिफ्ट करून ओझरखेड धरणात पाठवले जाईल व या पाण्याचा वापर शेतीसाठी तसेच औष्णिक विद्युत केंद्रासाठी केला जाणार आहे. आज ओझरखेड धरणात पाणी सोडत योजनेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे.

यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजीमंत्री गुलाबराव देवकर, रोहिणीताई खडसे व प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा – “१२ आमदार तालिबानी किंवा गुंड नाहीत; राज्यपालांवर दबाव असेल तर…”,संजय राऊतांचं वक्तव्य

एकनाथ खडसे यांचा राजकीय प्रवास

– जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर तालुक्यातील कोठाडी गावात दोन सप्टेंबर १९५२ रोजी एकनाथ खडसे यांचा जन्म झाला.

– एकनाथ खडसे यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात ग्राम पंचायतीच्या निवडणुकीपासून झाली. ग्राम पंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत एकनाथ खडसे यांना पराभवाचा सामना करावा लागला.

– त्यानंतर १९८७ साली ते कोठाडी गावचे सरपंच झाले.

– १९८९ साली भाजपाच्या तिकिटावर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकली.

– १९८० साली भाजपामधून त्यांनी सक्रीय राजकारण सुरु केले. उत्तर महाराष्ट्रात भाजपाचा जनाधार वाढवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ओबीसी नेते म्हणून त्यांनी स्वत:ची प्रतिमा तयार केली.

– महाराष्ट्रात १९९५ साली पहिल्यांदा शिवसेना-भाजपा युतीचे सरकार सत्तेवर आले. युती सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी अर्थ-सिंचन ही खाती संभाळली.

– नोव्हेंबर २००९ ते ऑक्टोंबर २०१४ या काळात ते राज्याचे विरोधी पक्ष नेते होते. प्रभावी वकृत्व आणि मुद्देसूद विषय मांडण्याची कला त्यांच्याकडे आहे.

– पदाचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे एकनाथ खडसे यांनी तीन जून २०१६ रोजी महसूलमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

– २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने त्यांना उमेदवारी दिली नाही. खडसेंऐवजी भाजपाने त्यांच्या मुलीला रोहिणी खडसेंना तिकिट दिले. शिवसेनेच्या चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसेंचा अत्यंत कमी मतांच्या फरकाने पराभव केला.

– २०१९ पर्यंत सलग सहावेळा एकनाथ खडसे यांनी मुक्ताई नगर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक जिंकली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Eknath khadse birthday jayant patil unique gift to khadse ncp srk