भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकासाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासहित अनेक विद्यमान आमदार तसंच नव्याने पक्षात आलेल्यांचीही नावं जाहीर करण्यात आली आहेत. मात्र यादीत एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे यासारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश नाही आहे. दरम्यान एकनाथ खडसे यांनी यादीत नाव नसतानाही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे एकनाथ खडसे बंडखोरीच्या तयारीत तर नाहीत ना अशी चर्चा सुरु झाली आहे.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बोलताना एकनाथ खडसे यांनी आणखी एक यादी येणार असून त्यामध्ये नाव येण्याची शक्यता येत नाही असं सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “मी सत्तेत असताना आणि विरोधा पक्षात असतानाही पक्षाची कामं केली. मी अत्यंत प्रमाणिकपणे पक्षासाठी काम केलं. मला अनेक प्रलोभनं आली. पण मी कधीही पक्षाची साथ सोडली नाही. पक्षाशी प्रामाणिक राहणं हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केली आहे”. यावेळी त्यांनी अर्ज आज का भरला असं विचारलं असता आज मुहूर्त चांगला होता त्यामुळे अर्ज भरल्याचं त्यांनी पत्रकारांना सांगितलं.

आणखी वाचा : वडाळयातून कालिदास कोळंबकरांना उमेदवारी, श्रद्धा जाधव बंडखोरी करणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेचा समारोप करून भाजपने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. शक्तिप्रदर्शनाद्वारे वातावरणनिर्मिती करताना विरोधकांवर नव्याने हल्ले सुरू केले. स्वबळावर सत्ता आणण्यासाठी उत्तर महाराष्ट्र महत्त्वाचा ठरू शकतो, हे लक्षात घेऊन त्यांची तयारी आहे. यासाठी काही कठोर निर्णय घेतले जातील. ज्येष्ठांना तिकीट न देण्याचे पक्षाचे धोरण आहे. तिकीटवाटपात मुक्ताईनगरमधून पुन्हा एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली जाईल की नाही, याबद्दल शंका आहे.

गेल्या वेळचे चित्र
उत्तर महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण ३५ जागा आहेत. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. भाजपने पूर्वी चारवर असणारे संख्याबळ १४ वर नेले. शिवसेना, काँग्रेसने प्रत्येकी सात, तर राष्ट्रवादीला पाच जागा जिंकता आल्या. माकपला एक तर एका जागेवर अपक्ष निवडून आला. मत विभागणीमुळे काँग्रेस, राष्ट्रवादीला अनेक मतदारसंघ गमवावे लागले. मनसेचा नाशिकमधील बालेकिल्ला भुईसपाट झाला. त्या निवडणुकीत १७ विद्यमान आमदारांना मतदारांनी घरी बसविले.