राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना मुंबईमधील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. खडसेंवर एक महत्वाची शस्त्रक्रीया करण्यात येणार असून यासाठीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे.

पुण्यामधील जमीन घोटाळा प्रकरणी खडसे आज मुंबईतील सेशन कोर्टामध्ये अनुपस्थित राहिले होते. याच अनुपस्थितीसंदर्भात न्यायालयाला माहिती देताना वकिलांनी खडसे आजारी असल्याचं सांगितलं. खडसेंवर एक महत्वाची शस्त्रक्रीया होणार आहे. त्यासाठी त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय असं वकिलांनी न्यायालयाला सांगितल्याचं टीव्ही ९ ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

एकीकडे खडसेंविरोधातील सुनावणीमध्ये वकिलांनी त्यांची बाजू मांडली असताना दुसरीकडे खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनी याच प्रकरणात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. याप्रकरणी ईडीकडून चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. त्यात खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी या दोघांची आरोपी म्हणून नावं आहेत. २०१६ सालचं हे प्रकरण आहे. खडसे त्यावेळी महसूल मंत्री होते. याच प्रकरणामध्ये खडसेंचे जावई गिरीश चौधरी सध्या अटकेत आहेत.

मात्र खडसेंच्या वकिलांनी दिलेल्या माहितीवरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शंका उपस्थित करत टीका केलीय. एकनाथ खडसे हे न्यायालयासमोर खोटं बोलत असल्याचा आरोप दमानिया यांनी ट्विटरवरुन केलाय.

भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता सध्या दिसत आहे. फडणवीस सरकारच्या कालावमध्ये महसूल मंत्री पदी असताना खडसेंनी पुण्यातील भोसरीमधील ३.१ एकर जमीनीचा एमआयडीसीमधील प्लॉट खरेदी करण्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ साली करण्यात आला. या जमीनीची किंमत ३१ कोटी रुपये इतकी असून ती केवळ ३ कोटी ७० लाखांना विकण्यात आलाचा दावा करण्यात आला आहे. हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने १९७१ साली तो अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी १२ एप्रिल, २०१६ रोजी या प्रकरणासंदर्भात बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा या प्रकरणात करण्यात आलाय. या बैठकीनंतर अवघ्या पंधरवड्यातच उकानी यांनी खडसेंच्या नातेवाईकांना म्हणजेच पत्नी आणि जवायाला भूखंड विकला होता.