shivsena Eknath shinde calls sunil raut over sanjay raut health Video : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी शिंदेंचा फोनवर बोलतानाचा व्हिडीओ पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे.
संजय राऊत यांना काही दिवसांपूर्वी शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्याने मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानंतर एकनाथ शिंदेंनी फोनवरून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. यासाठी त्यांनी संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांना फोन केला.
उदय सामंत यांनी पोस्ट केला व्हिडीओ
मंत्री उदय सामंत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एकनाथ शिंदेंचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये उपमुख्यमंत्री फोनवर बोलताना दिसत आहेत. “राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी त्यांचे बंधू सुनील राऊत यांना फोन करून प्रकृतीविषयी सविस्तर माहिती घेतली.”
“साहेबांची ही सहृदयता आणि सर्वांप्रती असलेली आपुलकी हीच त्यांची खरी ओळख आहे,” असे सामंत त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. या व्हिडीओमध्ये एकनाथ शिंदे हे “त्यांना सांग बरे व्हा लवकर” असे म्हणताना ऐकू येत आहे.
संजय राऊतांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या आजारपणाबद्दल माहिती दिली होती. “आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले. पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन,” असे संजय राऊत म्हणाले होते.
