शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्यावरून सध्या राज्यात मोठं राजकीय वादळ निर्माण झालं आहे. शिवसेनेच्या काही आमदारांसह एकनाथ शिंदे गुजरातच्या सूरतमध्ये ला मेरिडिअन हॉटेलमध्ये थांबले आहेत. भाजपासोबत सरकार स्थापन करावं अशी अट शिंदेंनी उद्धव ठाकरेंना घातल्याचं सांगितलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं सरकार दोलायमान अवस्थेत असताना दुसरीकडे विरोधकांकडून ही संधी साधत सरकारवर टीका केली जात आहे. एकेकाळचे शिवसेनेचे आक्रमक नेते आणि सध्या भाजपाचे खासदार म्हणून केंद्रात मंत्री असलेले नारायण राणे यांनी देखील या सगळ्या प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
“एकनाथ शिंदेंना वारंवार दिलेली अपमानाची वागणूक आणि न पाळलेली आश्वासनं यातून त्यांचा स्वाभिमान जागृत झाला आणि त्यातून त्यांनी आज बंड केलं. बाळासाहेब ठाकरेंनी ४८ वर्षांहून जास्त काळ शिवसेना पक्ष सांभाळला, वाढवला. शिवसैनिकांना प्रेम आणि विश्वास दिला. याच्याउलट मुख्यमंत्री असूनही उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख असताना अडीच वर्षही पक्ष सांभाळता आला नाही. सहकाऱ्यांना विश्वास देता आला नाही. प्रेम तर सोडाच. मातोश्रीच्या पिंजऱ्यातून बाहेर पडायचं नाही आणि फक्त आदेश द्यायचे. त्यामुळेच गुदमरलेले शिवसैनिक, मंत्री आणि आमदारांनी त्यागाच्या भूमिकेतून हा बंड केला आहे”, असं नारायण राणे म्हणाले आहेत.
“मुख्यमंत्रीपदासाठी तडजोड झाली हे शिंदेंना माहितीये”
“एकनाथ शिंदेंची भूमिका मी ऐकली. शिवसेनेचे प्रतिनिधी त्यांना सूरतला भेटले. त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडून भाजपासोबत आलात, सरकार स्थापन केलं तर आम्ही विचार करू. शिंदेंची भूमिका हिंदुत्ववादी विचारांची असून अडीच वर्षांपूर्वी फसवणूक झाली हेही ते कबूल करत आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी तडजोड झाली हेही त्यांना माहिती आहे”, असंही नारायण राणे म्हणाले.
“२१ जून…वर्षातला सर्वात मोठा दिवस की…”, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनाट्यावर मनसेचा खोचक टोला!
हे सगळं होत असताना एक क्षणही मुख्यमंत्रीपदावर राहायला नको होतं. पण ती नैतिकता उद्धव ठाकरेंमध्ये नाही. कायद्यांबाबत किती माहिती आहे यावर प्रश्नचिन्ह आहे. ५६ मधले ३५ गेले, राहिले किती? सरकार अल्पमतात आल्यानंतर राजीनामा का देत नाहीत? वाट कसली पाहात आहात?” असा सवाल नारायण राणेंनी केला आहे. “एकनाथ शिंदे नामधारी नगरविकास मंत्री होते. मातोश्रीच्या बाहेर कुणालाही त्याचे अधिकार नाहीत. शिवसेनेच्या वाट्याचं सरकार फक्त मातोश्री आणि त्यांच्या नातेवाईकांसाठीच होतं”, असंही ते म्हणाले.
“मी बाळासाहेबांना पत्र लिहिलं होतं की उद्धव ठाकरे…”
“एकनाथ शिंदेंनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. नाहीतर आनंद दिघेंच्या बाबतीत जे काही झालं, ते त्यांच्या बाबतीतही घडलं असतं. आनंद दिघेंच्या बाबतीत जे घडलं, त्याआधी त्यांना मातोश्री बंद होतं. त्यामुळेच एकनाथ शिंदेंचा निर्णय योग्य आहे. उद्धव ठाकरेंना शिवसेनेत कुणी प्रभावी झालेलं चालत नाही. भुजबळांचा महाराष्ट्रात नावलौकिक व्हायला लागला आणि यांनी काटछाट केली. मी बाळासाहेब ठाकरेंना पत्र लिहिलं होतं की उद्धव ठाकरेच पक्षात तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत. आमचे निर्णय फिरवत आहेत”, असंही राणे म्हणाले.