Eknath Shinde on Raj Thackeray : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन सुरू केलं आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण आंदोलन सुरू असून आज (३१ ऑगस्ट) आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील लाखो मराठा आंदोलक सहभागी झालेले आहेत.
दरम्यान, हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाल्यामुळे मुंबईची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. “मराठा आंदोलक पुन्हा मुंबईला का आले? हे एकनाथ शिंदेंना विचारा. सर्व प्रश्नांची उत्तरं तेच देतील”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला आता एकनाथ शिंदे यांनी उत्तर देत राज ठाकरेंनी पूर्ण माहिती घ्यायला हवी होती, असं म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
राज ठाकरे यांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “राज ठाकरेंनी पूर्ण माहिती घ्यायला हवी होती. खरं म्हणजे आरक्षण कोणामुळे गेलं? त्यांना राज ठाकरेंनी प्रश्न विचारायला पाहिजे होते. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने दिलेलं आरक्षण आम्ही उच्च न्यायालयात टिकवलं होतं. मात्र, तुम्हाला ते आरक्षण का टिकवता आलं नाही? असा प्रश्न तत्कालीन मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारला राज ठाकरेंनी विचारायला हवा होता”, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
“आता मी जे काही बोलत आहे ते काही लोकांना माहिती व्हावं की, १० टक्के आरक्षण आम्ही दिलं, कुणबी प्रमाणपत्र शिंदे समिती स्थापन करून अनेक पुरावे शोधून त्यामध्ये कुणबी नोंदी शोधल्या. त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात मराठा समाजाला झाला. खरं म्हणजे आरक्षण कोणामुळे गेलं? त्यांनाच राज ठाकरेंनी प्रश्न विचारायला पाहिजे होते”, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
मराठा विरुद्ध ओबीसी या आरक्षणावरील वादाकडे कसं पाहता? असं विचारल्यावर राज ठाकरे म्हणाले होते, “मी याचं उत्तर देऊ शकणार नाही. एकनाथ शिंदे तुमच्यासमोर येतील तेव्हा तुम्ही हे त्यांनाच विचारा. आरक्षणाबाबतची माझी भूमिका सर्वांना माहिती आहे. ते सगळं आता जुनं झालं. मात्र, सध्याच्या घटनांवर केवळ एकनाथ शिंदे हेच बोलू शकतात.”
“मुंबईतील वाहतूक कोंडी, तुम्ही (माध्यम) म्हणताय तसा लोकांना त्रास होतोय वगैरे गोष्टींवर शिंदे बोलू शकतात. कारण मागच्या वेळेस एकनाथ शिंदे हेच नवी मुंबईला गेले होते ना? त्यांनी नवी मुंबईत जाऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला असं सांगितलं जात होतं. मग मराठा आंदोलक परत का आले या सर्व गोष्टींची उत्तरं केवळ एकनाथ शिंदे देऊ शकतात”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.