सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर ३६३ वा शिवप्रतापदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील हजेरी लावली. कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी गड-किल्ल्यांच्या संवर्धनाची गरज असून त्यासाठी नव्या दुर्ग प्राधिकरणाची स्थापना केली जाईल, अशी घोषणा केली. तसेच त्यांनी प्रतापगडाच्या संवर्धनासाठी २५ कोटी रुपयांची निधी देण्याचे जाहीर केले. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना पक्षातील बंडखोरीवरही भाष्य केले. आम्ही टीका करणाऱ्यांना आमच्या कामातून उत्तर देऊ. जनतेच्या जे मनात होते तेच आम्ही केलेले आहे. ज्यांनी ३७० कलम हटवले, अयोध्येत राम मंदिर उभारणीचे काम केले त्यांच्याशी आम्ही युती केली असेही शिंदे म्हणाले.

“शेतकऱ्यांचा पुत्र मुख्यमंत्री होऊ शकत नाही का. सर्वसामान्य कुटुंबातील एक व्यक्ती मुख्यमंत्री झाल्याचे अनेकांना रुचत नाहीये. आम्ही जेथे-जेथे जातोय तेथे अनेक लोक आमच्या स्वागतसाठी उभे आहेत. राज्यात सरकार बदलल्यामुळे चांगली कामे सुरू आहेत, अशा भावना लोक व्यक्त करत आहेत,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा >>> सतत उलट्या होत असल्याने रुग्णालयात जाऊन केली तपासणी, पोटात असं काही सापडलं की डॉक्टरही चक्रावले

“हे सरकार आल्यामुळे राज्यात सण मोठ्या उत्त्साहात साजरे केले जात आहेत. परिवर्तन घडले नसते तर आज एवढा उत्साह नसता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने हे सत्तापरिवर्तन झाले आहे. ज्यांच्याकडे काही काम नाही, ते आरोप करत असतात. आम्ही आरोप करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार आहोत. येथील जनता सुज्ञ आहे. येथील लोकांना कोण कसे काम करत आहे, ते समजते,” अशी घणाघाती टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

हेही वाचा >>>गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी लवकरच ‘दुर्ग प्राधिकरणा’ची स्थापना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आम्ही कोणतेही चुकीचे काम केले नाही. या राज्यातील जनतेच्या जे मनात होते, तेच आम्ही केले. अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्याचे स्वप्न बाळासाहेब ठाकरे यांचे होते. कलम ३७० हटवण्याची मागणी बाळासाहेब ठाकरेंची होती. तेच काम भाजपाने करून दाखवले. याच भाजपाशी आम्ही युती केली आहे. आमचा कोणताही वैयक्तिक हेतू नाही. कष्टकरी, शेतकरी कामगार, महिलांना न्याय देण्याचा आमचा उद्देश आहे. आपण लोकांना न्याय देणाऱ्या सरकारची स्थापना केली,” असेदेखील एकनाथ शिंदे यांनी सांगितले.