हिंगोली : ज्यांनी कावड यात्रेकडे पाठ फिरवली, जे लोक कार्यकर्त्यांना कस्पटासमान वागवतात, घरगडी समजतात, त्यांना जागा दाखवली. आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सर्वसामान्यांना सोन्याचे दिवस आणण्याचे प्रयत्न करणे, हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी तयार रहावे, असे आवाहन केले.
शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या कावड यात्रेचा समारोप कार्यक्रम हिंगोली येथील महात्मा गांधीपुतळा चौकात सोमवारी झाला. कार्यक्रमास आमदार बाबुराव कोहळीकर, हेमंत पाटील, माजी खासदार सुभाष वानखेडे, राजेंद्र शिखरे यांच्यासह शिवसेनेतील नेत्यांची उपस्थिती होती. ‘आमदार बांगर यांनी काही जणांना कावडयात्रेसाठी बोलावले होते. परंतु, त्यांनी कावड यात्रेकडे पाठ फिरवली होती. ज्यांना कावडीत बसायचे होते ते कावड यात्रेला कसे येणार, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.
राज्यातील काही जण कार्यकर्त्यांना घरगडी म्हणून वागवितात. मात्र, आम्ही सर्वसामान्यांसोबत राहून विकासकामे करणारे आहोत, असेही शिंदे म्हणाले. राज्याला पुढे नेण्याचे काम करायचे आहे, असे शिंदे म्हणाले. आम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलो नसलो तरी जनतेला, सर्वसामान्यांना सोन्याचे दिवस आणण्याचे प्रयत्न करणार असून, हाच आमचा अजेंडा असल्याचे ते म्हणाले. आमचा जाहीरनामा म्हणजे चुनावी जुमला असल्याचा आरोप काही जणांकडून करण्यात आला. लाडकी बहीण योजनासंबंधी अफवा पसरवण्यात आल्या. परंतु, लाडकी बहीण योजना बंद होणारच नाही. त्यांनीच सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्यांना जागा दाखवली. म्हणूनच जाहिरनाम्यातील सर्व योजना टप्प्याटप्याने पूर्ण करणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसच्या काळात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या वेळी काँग्रेसची मंडळी दहशतवादाला धर्म नसतो, असे सांगत होते. मात्र, मालेगाव स्फोटाला भगवा दहशतवाद म्हटले. मतांसाठी व्होट बँक वाचविण्यासाठी किती लाचारी करणार, असा सवाल त्यांनी केला. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले तरी सैन्याच्या कामगिरीवर शंका घेणारे हे कुठले देशभक्त आहेत. व्होट बँकेचे राजकारण करताना भगवा दहशतवाद म्हणणाऱ्या हिंदू द्वेषींना जनताच त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा दावा त्यांनी केला.