मराठा आरक्षणावरून महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी शिंदे गटाचे हिंगोली-उमरखेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी नुकतंच खासदारकीचा राजीनामा दिला होता. यानंतर आता एकनाथ शिंदे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या कारणातून आपण राजीनामा देत आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

शिंदे गटाच्या दोन खासदारांनी राजीनामे दिल्याने एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना खासदार हेमंत गोडसे म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाची मागणी आहे की, त्यांना आरक्षण मिळावं. यासाठी अनेकदा लाखोंच्या संख्येनं मोर्चेदेखील निघाले. आजही सर्व मराठी समाजाच्या युवकांच्या भावना आहेत की, आम्हाला आरक्षण मिळालं तर खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय मिळेल. काही वर्षांपूर्वीचा मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला नाही, असा अहवाल असला तरी आज पुन्हा सर्वेक्षण केलं तर मला विश्वास आहे, मराठा समाज मागासलेला आहे, हे निष्पन्न होईल.”

हेही वाचा- शिंदे गटाच्या खासदारानंतर अजित पवार गटातील आमदार देणार राजीनामा? स्वत:च केलेल्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“या अगोदर मराठा समाजाच्या शेतकरी वर्गाकडे शेकडो एकर जमिनी होत्या. आज बघितलं तर कुणाकडे एक एकर तर कुणाकडे दोन एकर जमीन आहे. राज्यात अल्प भूदारक शेतकरी अधिकाधिक वाढत आहेत. शिक्षण घेतल्यानंतर मुलांना नोकरीसाठी आटापिटा करावा लागत आहे. शिक्षणासाठीही पैसे द्यावे लागतात. मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत म्हणून मी एक लोकसभा सदस्य म्हणून आणि आपली जबाबदारी म्हणून मी राजीनामा देत आहे”, अशी प्रतिक्रिया हेमंत गोडसे यांनी दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.