राज्यात आज शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या मतमोजणीची जोरदार चर्चा सुरू आहे. आज सकाळपासूनच या जिल्ह्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. कोकणात भाजपानं विजयाता नारळही फोडला असून ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील बदलत्या समीकरणांची विश्लेषकांमध्ये चर्चा सुरू झालेली असतानाच दुसरीकडे बंडखोर अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. भाजपाकडून तांबेंना पक्षप्रवेशाची खुली ऑफर आल्यानंतर या चर्चेला ऊत आलेला असताना याबाबत दीपक केसरकरांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

नेमकं काय घडलंय?

भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्यजीत तांबेंनी भाजपामध्ये प्रवेश करण्याबाबत सूचक विधान केलं होतं. “सत्यजितचा विजय निश्चित आहे. त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करावा यासाठी आमचा आग्रह राहणारच आहे”, असं म्हणत तांबेंना राधाकृष्ण विखे पाटील यांनी अप्रत्यक्षपणे भाजपामध्ये येण्याचीच ऑफर दिली आहे.

दरम्यान, आज एकीकडे निवडणूक निकालाकडे सगळ्यांचं लक्ष असताना दुसरीकडे तांबेंच्या भाजपा प्रवेशासंदर्भातल्या चर्चांना ऊत आला आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी यासंदर्भात शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार दीपक केसरकर यांना विचारणा केली असता केसरकरांनी यावर सूचक शब्दांत प्रतिक्रिया देत तांबेंच्या भाजपा प्रवेशाची शक्यता नाकारली आहे.

Maharashtra MLC Election Results Live: पहिला विजय भाजपाच्या नावे! कोकणात ज्ञानेश्वर म्हात्रेंची मुसंडी, मविआच्या पाठिंब्यानंतरही बाळाराम पाटलांची पीछेहाट!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हणाले दीपक केसरकर?

दीपक केसरकरांनी सत्यजीत तांबेंच्या विजयाची खात्री व्यक्त करतानाच त्यांच्या भाजपा प्रवेशामध्ये येणाऱ्या नियमाची अडचण स्पष्ट केली. “सत्यजीत तांबे भाजपामध्ये जाणार नाहीत. मी एवढंच सांगितलं की तांबे कुठल्या पक्षात गेलेले नाहीत. त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज केला आहे ही वस्तुस्थिती आहे. जेव्हा तुम्ही विधानपरिषदेत अपक्ष म्हणून राहता, त्यानंतर तुम्ही कुठल्या पक्षात जाऊ शकत नाहीत. तुम्ही एखाद्या पक्षाला पाठिंबा देऊ शकता. तांबे निवडून येतील अशी मला १०० टक्के खात्री आहे”, असं केसरकर म्हणाले.