महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवं सरकार अस्तित्वात आलं. मात्र, तेव्हापासून शिवसेना आणि शिंदे गट यांच्यामधील वितुष्ट कमालीचं विकोपाला गेलं आहे. सातत्याने दोन्ही बाजूंनी एकमेकांवर तोंडसुख घेतलं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव दौऱ्यावर असताना त्यांच्या या दौऱ्यावरून विरोधकांनी टीका केली आहे. आदित्य ठाकरे ज्या ज्या ठिकाणी गेले, तिथेच एकनाथ शिंदे दौरा करत असल्याचं बोललं जात असताना त्याला शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी टीव्ही ९ शी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे.

राज्यात एकनाथ शिंदे विरुद्ध आदित्य ठाकरे, असा सामना सुरू आहे का? अशी विचारणा गुलाबराव पाटलांना करताच त्यांनी आदित्य ठाकरेंवर खोचक शब्दांत टीकास्र सोडलं आहे. “आदित्य ठाकरेंना फक्त ठाकरे नाव असल्यामुळेच महत्त्व आहे. एकनाथ शिंदे जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते आहेत. पोलिसांची काठीही त्यांनी खाल्ली आहे. तुरुंगवास भोगलेला आहे”, असं गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

“आदित्य ठाकरेंसाठी दोन एमएलसीच्या जागा द्याव्या लागल्या”

“आदित्य ठाकरेंना आमदार करण्यासाठी समोरच्या पक्षाचे दुसरे दोन आमदार करावे लागले. विधानपरिषदेच्या दोन जागा द्याव्या लागल्या. पण एकनाथ शिंदे हे ग्रासरूटचं नेतृत्व आहे. आदित्य ठाकरे हे मालमत्तेचे वारसदार आहेत, पण ते विचारांचे वारसदार होऊ शकत नाहीत. विचारांचे वारसदार आम्हीच आहोत”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंद्रकांत खैरेंना प्रत्युत्तर

दरम्यान, “आदित्य ठाकरेंबद्दल बोललात, तर गुलाबराव पाटलांचा गळा दाबीन”, असं विधान करणारे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांना गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “माझ्या गळ्यापर्यंत काय, माझ्या नखापर्यंत ते पोहोचू शकत नाहीत. ते ज्येष्ठ असल्यामुळे त्यांचा सन्मान आपण करतो. पण जर माझं तोंड सरकलं, तर त्यांना आवरणं अवघड होऊन जाईल”, अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी खोचक टीका केली.