scorecardresearch

अजित पवार पुन्हा भाजपासोबत जाणार का? प्रश्न विचारताच शहाजीबापू म्हणाले, “ते कधी काय करतील…”!

शहाजीबापू पाटील म्हणतात, “अजित पवारांना आता दुसरं काही कामच राहिलं नाहीये. कारण आत्तापर्यंत ते सत्तेत…!”

अजित पवार पुन्हा भाजपासोबत जाणार का? प्रश्न विचारताच शहाजीबापू म्हणाले, “ते कधी काय करतील…”!
शहाजीबापू पाटलांची अजित पवारांवर खोचक टीका!

‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल’ या आपल्या संवादामुळे एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीच्या तणावपूर्ण काळातही चर्चेचा विषय ठरलेले शहाजीबापू पाटील यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे. शिंदे गटाचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी राज्यात नवीन सरकार आल्यापासून विरोधकांवर खोचक शब्दांत टोलेबाजी करण्याची एकही संधी सोडलेली नाही. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दसरा मेळाव्यातील भाषणांसंदर्भात केलेल्या विधानावरून शहाजीबापूंनी विनोदी टिप्पणी केली आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना राज्यातल्या विविध राजकीय विषयांवर भाष्य केलं. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं भाषण एकाच वेळी सुरू झालं तर कुणाचं भाषण ऐकणार? असा प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले, “एकाच वेळी दोन्ही भाषणं सुरू झाली तर मी आधी उद्धव ठाकरेंचं ऐकेन आणि नंतर एकनाथ शिंदेंचं ऐकेन. अर्ध्या तासाने काही फरक पडणार नाही.”

“अजित पवारांना दुसरं काम उरलं नाहीये”

दरम्यान, अजित पवारांच्या याच विधानाचा संदर्भ घेत शहाजीबापूंनी सांगोल्यात बोलताना खोचक टोला लगावला आहे. “अजित पवारांना आता ही दसऱ्याची भाषणं ऐकणं, इंदुरीकर महाराजांचं कीर्तन ऐकणं हेच काम राहिलंय. भाषणं ऐकण्याशिवाय अजित पवारांना दुसरं काही काम उरलं नाहीये. ते विरोधी पक्षनेते झाले आहेत. पण ते कसं करायचं असतं ते त्यांना अजून कळत नाहीये. कारण अजित पवार कायम सत्तेवर राहिले आहेत. ते अजित पवारांना समजलं, पण हे अजून समजेना”, असं शहाजीबापू म्हणाले.

फडणवीसांकडे ट्रेनिंग, राज ठाकरेंचे दौरे आणि दसरा मेळाव्याचं भाषण; अजित पवारांची पुण्यात तुफान टोलेबाजी!

अजित पवार पुन्हा भाजपासोबत जातील का?

प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी अजित पवार आणि भाजपा पुन्हा एकत्र येतील का? असा विचारल्यावर शहाजीबापू पाटील यांनी मिश्किल टिप्पणी केली. “हा मुद्दा काही माझ्यासारख्या छोट्या माणसाचा नाही. माझं आणि अजित पवारांचं नातं जिव्हाळ्याचं आहे. पण अजित पवार काय करतील हे शरद पवारांनाही कळलं नाही, ते मला कसं कळणार? त्यामुळे अजित पवार कधी कुठला झटका देतील काही सांगता येत नाही”, असं शहाजीबापू पाटील म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या