शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. नाराज असलेले एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांसह आधी सुरत तर आता गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. गुवाहाटीला पोहोचल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडामागची भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
“आम्ही अद्याप कोणाला समर्थन देण्याचा निर्णय घेतलेला नाही. आम्ही ४० पेक्षा अधिक आमदार एकत्र आहोत. आम्ही अद्याप शिवसेना सोडण्याचा किंवा दुसऱ्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. फक्त आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्व, त्यांची विचारधारा आम्ही पुढे घेऊन जात आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये बाळासाहेबांच्या विचारांची तडजोड सत्तेसाठी आम्ही करणार नाही,” असे एकनाथ शिंदे यांनी टिव्ही ९ सोबत बोलताना म्हटले आहे.
बाळासाहेबांच्या विचारांचे आमदार एकत्र
“आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे आहोत. म्हणून कुणावरही टीका करण्याची मला सवय नाही आणि आवडतही नाही. आज मात्र बाळासाहेबांच्या विचारांचे आमदार एकत्र आले आहेत. आम्ही कोणाच्याही विरोधामध्ये कोणतेही भाष्य केलेले नाही. विकासाचे राजकारण आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे आमचा प्रयत्न असणार आहे,” असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
“मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आजही आहे. कारण बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे आमच्यासाठी दैवत आहेत आणि त्यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत. त्यामुळे काल आज आणि उद्या आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिकच असणार आहोत. आमची भूमिका सुरुवातीपासून हिंदुत्वाती होती. सत्तेसाठी बाळासाहेबांच्या हिंदुत्वासोबत कुठल्याही बाबतीत तडजोड आम्ही करणार नाही,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.
तुम्ही बोलणी करायला माणसे पाठवता आणि तिकडे कारवाई होते
“माझ्यासोबत कुठल्याही जोर जबरदस्तीने आमदार आलेले नाहीत. ते स्वेच्छेने आलेले आहेत. जवळपास ४० पेक्षा जास्त आमदार सोबत आहेत. कुठलीही चर्चा झाली नाही कारण मिलिंद नार्वेकर यांना सांगितले की तुम्ही या ठिकाणी माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेला आहात. पण चर्चा करायला येत असताना मी कुठलेही पक्षविरोधी काम केले नाही, कुठलाही निर्णय घेतला नाही. अशावेळी गटनेते पदावरुन मला काढले. माझे पुतळे जाळले गेले. मी उद्धव ठाकरेंना सांगितले की तुम्ही बोलणी करायला माणसे पाठवता आणि तिकडे कारवाई होत आहे. हे बरोबर नाही. यापूर्वी देखील आपल्याकडे मी आमदारांच्या मनातील भावना मी मांडली आहे. त्यामुळे आमदारांसोबत बोलून पुढचा निर्णय घेतला जाईल,” असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
नियमबाह्य पद्धतीने गटनेता निवडला गेला
“काल जो गटनेता निवडला गेला तो नियमबाह्य पद्धतीने निवडला गेला. कारण सर्व आमदारांची बैठक घेऊन गटनेता निवडण्याची पद्धत आहे. परंतु बहुमताचा आकडा आमच्यासोबत असल्याने ती निवड वैध आहे की अवैध हा तांत्रिक मुद्दा होऊ शकतो,” असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
“आमदारांच्या मनात खदखद आणि रोष गेली अडीच वर्षे होता. तीन ते चार लाख लोकांमधून हे आमदार निवडून आले आहेत. जेव्हा त्यांना वाटतं की निर्णय घेतला पाहिजे तेव्हा ते सद्सद्विवेक बुद्धी निर्णय घेतात. त्यामुळे यामागे आमदारांच्या मतदारसंघातील कामे असतील आणि बाळासाहेबांच्या हिदुंत्वाचा विचारधारा असेल,” असेही एकनाथ शिंदे म्हणाले.