“लोकशाहीमध्ये असा प्रकार…”; संजय राऊतांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर

शिवसेना आमदारांचे अपहरण करुन मारहाण केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे

“लोकशाहीमध्ये असा प्रकार…”; संजय राऊतांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर
शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि खासदार संजय राऊत… (संग्रहीत फोटो)

शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. नाराज असलेले एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांसह आधी सुरत तर आता गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. गुवाहाटीला पोहोचल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडामागची भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी बोलतना एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेना आमदार नितीन देशमुख यांचं अपहरण झालं आहे. त्यांनी स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा गुजरात पोलीस व गुंडांनी बेदम मारहाण केली, असा खळबळजनक आरोप ट्विटरच्या माध्यमातून संजय राऊत यांनी केला होता. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि गुजरात मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करून गुजरातच्या भूमीवर हिंसा सुरू आहे का? असा सवालही केला होता.

यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “संजय राऊत आमचे नेते आहेत. त्यांची काही माहिती असू शकते. परंतु असा कुठलाही प्रकार झालेला नाही. जवळपास ४५ आमदार या ठिकाणी आहेत. लोकशाहीमध्ये असा प्रकार होऊ शकत नाही. कोणत्याही प्रकारची मारहाण झालेली नाही. हा एक धोरणाचा भाग आहे,” असे एकनाथ शिंदे यांनी टिव्ही९ सोबत बोलताना म्हटले आहे.

“माझ्यासोबत ४० आमदार आहेत, आणखी १० येणार”; गुवाहाटीमध्ये पोहोचलेल्या एकनाथ शिंदेंचा दावा

काय म्हणाले होते संजय राऊत?

“बऱ्याच दिवसांपासून ऑपरेशन लोटस सुरू होतं. तसं नसतं तर आमच्या आमदारांचं अपहरण करून गुजरातला नेलं नसतं. त्यांना गुजरात पोलीस व केंद्रीय पोलिसांच्या गराड्यात ठेवण्यात आलंय. अनेक आमदारांनी तेथून सुटकेचा प्रयत्न केला. त्यांच्यावर दहशत बसवण्यात आली. आमदारांवर खुनी हल्ले झाल्याची माहिती मिळाली आहे. काही आमदारांनी आमच्या जीवाला धोका आहे, इथे आमचा खूनही होऊ शकतो, असं कळवलं आहे,” असे संजय राऊत म्हणाले होते.

एकनाथ शिंदेंवर आनंद दिघेंच्या कुटुंबाकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “दिघे साहेब असते तर गद्दारी…”

४० आमदार माझ्यासोबत – एकनाथ शिंदे

“शिवसेनेचे ४० आमदार माझ्यासोबत आहेत. आम्ही सर्व जण बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि भूमिका पुढे घेऊन जाणार आहोत. मला कोणावर टीका करायची नाही. इथे शिवसेनेचे आमदार आहेत आणि आम्हाला बाळासाहेबांचे हिंदुत्व पुढे घेऊन जायचे आहे. माझ्यासोबत ४० आमदार इथे आले आहेत आणि आणखी १० येणार आहेत,” असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर काँग्रेसही सतर्क; सर्व काँग्रेस आमदारांना लाइव्ह लोकेशन पाठण्याचे आदेश
फोटो गॅलरी