Eknath Shinde : २२ एप्रिलच्या दिवशी पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी पहलगाम या ठिकाणी निष्पाप पर्यटकांचा बळी घेतला. यानंतर पाकिस्तानला काय उत्तर दिलं जाणार? याकडे प्रत्येक भारतीयाचं लक्ष लागलं होतं. भारताने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला उत्तर दिलं.

ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर काय घडलं?

६ आणि ७ मेच्या रात्री भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाईला उत्तर दिलं. यानंतर पाकिस्तानचे नापाक इरादे जगाने पाहिले. ड्रोन हल्ले करणं, तोफांचा मारा, गोळीबार हे करणं पाकिस्तानने थांबवलं नाही. त्यामुळे भारताने त्यांना जशास तसं उत्तर दिलं. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी म्हणजेच १० मे च्या दिवशी संध्याकाळी ५ च्या दरमम्यान शस्त्रविराम करण्यास दोन्ही देशांनी तयारी दाखवल्याची पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनीही ही माहिती दिली. त्याचप्रमाणे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही लष्करी कारवाई थांबवण्याबाबत पाकिस्तानने सामंजस्य करार केल्याचं स्पष्ट केलं. मात्र भारत दहशतवादाविरोधात कुठलीही कारवाई सहन करणार नाही हेदेखील पाकिस्तानला ठणकावलं. दोन्ही देशातला संघर्ष थांबल्याची माहिती समोर आल्यानंतर अवघ्या तासांतच पाकिस्तानची आगळीक पुन्हा समोर आली. यानंतर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

पाकिस्तानने दहशतवादी हल्ला करुन सुरुवात केली होती. त्यांना आपण उत्तर दिलं. त्यानंतर शस्त्र विराम दोन्ही देशांनी चर्चा करुन केला होता. मात्र पाकिस्तानने बेईमानी केली. पाकिस्तानने अशा पद्धतीने याआधीही अनेकदा शस्त्रविरामाचं उल्लंघन केलं होतं. पण मोदींनी त्यांना आणखी एक संधी दिली. तरीही आपल्या नागरिकांवर पाकिस्तानने हल्ला केला. मात्र त्याचा करारा जवाब पाकिस्तानला देण्यात आला आहे. पाकिस्तान पुन्हा हल्ला करेल असं भारतीय लष्कराला वाटलंही होतं. त्यामुळे शस्त्रविरामासंदर्भात कुठलीही पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली नव्हती. आता पाकिस्तान जर वारंवार जर या गोष्टी करणार असेल तर त्यांना धडा शिकवला जाईल.

कुत्र्याचं शेपूट वाकडं असतं ते कापावं लागतं-एकनाथ शिंदे

पाकिस्तानलाही माहीत आहे की भारताशी लढणं सोपं नाही. भारताशी लढलो तर आपलं अस्तित्व संपेल. पण असं आहे कुत्र्याचं शेपूट वाकडं असतं ते वाकडंच राहतं. पाकिस्तानची प्रवृत्ती अशीच आहे. कुत्र्याचं शेपूट वाकडं असल्याने कापलं जातं. वेळ पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील करतील. पाकिस्तानने त्यांच्या कुवतीप्रमाणे वागलं पाहिजे. अन्यथा नकाशावरुन पाकिस्तानचं नाव नकाशावरुन गायब करण्याची क्षमता भारतात आहे.