Eknath Shinde : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनात शनिवारी केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे. त्याचे पडसाद पुढचे ४८ तासात दिल्लीत उमटले. नीलम गोऱ्हे यांच्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जोरदार टीका केली. मात्र आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हे यांची पाठराखण केली आहे. तसंच राज ठाकरेंचं नाव घेत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेचे बाण चालवले आहेत.

नीलम गोऱ्हे यांनी काय वक्तव्य केलं होतं?

“कुठल्याही कार्यकर्त्याला कमी लेखण्याचं काही कारण नाही. २०१२ वगैरे पर्यंत मी पाहात आले आहे की शिवाजी पार्क येथे होणाऱ्या सभा, मेळाव्यांना एकनाथ शिंदे यांचेच कार्यकर्ते गर्दी करायचे. दुसरा भाग असा की संपर्क नको असेल नेत्यांना तर तिथे आपण राहण्यात काही अर्थ नाही. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं. बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं. नंतर अवनती होत गेली.” असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या होत्या.

Neelam Gorhe News Update
नीलम गोऱ्हे यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत (फोटो-एक्स पेज)

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“दाखवा ना मला मर्सिडिज कुठे आहेत? हे असले गयेगुजरे लोक आहेत त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही. महिला म्हणून त्यांच्याविषयी मला आदर आहे. राजकारणात त्यांनी चांगभलं केलं आहे. ते तसंच रहावं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंना उत्तर दिलं आहे. तसंच स्वतः मर्सिडिजमधून फिरतात मग लाडक्या बहिणींना पैसे का मिळत नाहीत? हे त्या का बघत नाहीत?” असा खोचक प्रश्न उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंना विचारला आहे. मात्र हे सगळे पडसाद उमटल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

“नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीच्या साहित्य संमेलनातील व्यासपीठावरुन एक वाक्य बोलल्या ते काहीजणांना प्रचंड झोंबलं. नीलम गोऱ्हेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढल्याने त्यांना मिरच्या लागल्या. नीलम गोऱ्हे यांच्यापूर्वीही अनेक लोक याबाबत बोलले आहेत”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “राज ठाकरे म्हणाले होते की त्यांना (उद्धव ठाकरे) खोके नाही तर कंटेनर लागतात. नारायण राणे, रामदास कदम, नितेश राणे, निलेश राणे देखील यापूर्वी बोलले आहेत. मात्र नीलम गोऱ्हे बोलल्या, तर लगेचच त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे हे तुम्हाला शोभत नाही.” असं म्हणत एकनाथ शिंदेंनी नीलम गोऱ्हेंची पाठराखण केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जादुगाराचा जीव पोपटात असतो तसा यांचा जीव महापालिकेत-शिंदे

एकनाथ शिंदे म्हणाले, “लोकसभेत फेक नरेटिव्हनं त्यांनी लोकांची मतं मिळवली, पण विधानसभेत लोकांनी त्यांना जागा दाखवली. आता आपलं अर्जुनासारखं एकच लक्ष्य पाहिजे, मिशन मुंबई! जादुगाराचा जीव पोपटात असतो, तसा काहींचा जीव या मुंबई महापालिकेत आहे. कारण काही लोकांना ती सोन्याचं अंडे देणारी कोंबडी वाटते, त्यांना आता कायमचं घरी बसवायचंय, विधानसभेत त्यांना आपण घरी बसवलंय, असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.