अहिल्यानगरः पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याचे आणि अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त करण्याचे काम आपले जवान हे पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानचे अस्तित्व मिटल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तारकेश्वर गडावर बोलताना आज, शुक्रवारी व्यक्त केला.

अहिल्यानगर-बीड जिल्ह्याच्या सीमेवरील तारकेश्वर गड येथे नारायणबाबा यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री, पद्मश्री डॉ. पोपटराव पवार, हभप अक्षय भोसले, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष विष्णुपंत ढाकणे, व्याख्याते गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘नारायणबाबा यांचा समाज प्रबोधनाचा व हिंदुत्व विचारांचा वारसा तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री चांगल्या पद्धतीने चालवत आहेत. तारकेश्वर गडाचा विकास व्हावा यासाठी आपण ठामपणे गडाच्या पाठीशी उभे राहू. जवळच मोहटादेवीचे मंदिर असल्याने संपूर्ण डोंगर म्हणजे भक्ती- शक्तीचा संगम आहे. गडाची महती देशाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचवण्याचे काम सर्वांनी करायला हवे. नारायणबाबांनी गोमातेची मोठी सेवा करण्याचे काम केले. गोरक्षकांना संरक्षण देण्याचे काम मुख्यमंत्री असताना आपण केले. राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान महत्त्वाचे आहे. या ठिकाणी येऊन मला आध्यात्मिक समाधान मिळते.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वेळी आदिनाथ शास्त्री म्हणाले, ‘शिंदे यांच्या पाठीशी गड ठामपणे उभा राहील. शिंदे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा दुसरा अवतार आहेत. मोदी जसे देशात काम करतात, तसेच काम शिंदे राज्यात करत आहेत. दोघांमध्ये केवळ पक्षभेद आहे. लाडकी बहीण योजनेमुळे ते घराघरांत जाऊन पोहोचले आहेत.’