एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी १६ आमदारांना आपात्रतेची नोटीस बजावली असताना दुसरीकडे मुंबईत घडामोडींना वेग आला आहे. शरद पवारांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज सकाळी पार पडली. त्यापाठोपाठ गुवाहाटीत एकनाथ शिंदेंनी बंडखोर आमदारांची बैठक बोलावली. त्यामुळे उच्चस्तरीय राजकीय हालचाली वाढल्या असताना कार्यकर्त्यांमध्ये देखील या वादाचे पडसाद उमटताना दिसत आहेत. बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर तोडफोडीच्या काही घटना उघडकीस आल्या आहेत. त्यातच आता बीडमधील परळीतल्या शिंदे समर्थकांनी केलेल्या बॅनरबाजीची चर्चा सुरू झाली आहे.

राज्यात विविध ठिकाणी बंडखोरांना विरोध करणारे शिवसैनिक जसे आक्रमक होताना दिसत आहेत, तसेच एकनाथ शिंदे आणि बंडखोरांचं समर्थन करणारे देखील कार्यकर्ते आणि समर्थक आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर या मुद्द्यावरून वेगळंच राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे.

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार?

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपासोबत सत्ता स्थापन करण्याची अट घातली आहे. मात्र, तसं न झाल्यास एकनाथ शिंदेंसोबत असणारा बंडखोर आमदारांचा गट भाजपासोबत जाऊन राज्यात नवं सरकार येण्याची समीकरणं काही राजकीय विश्लेषक मांडताना दिसत आहेत. या स्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचं उपमुख्यमंत्रीपद जाऊ शकतं. मात्र, त्यांच्या समर्थकांनी आत्तापासूनच शिंदेंच्या उपमुख्यमंत्रीपदाची बॅनरबाजी करायला सुरुवात केली आहे.

Video : “महाराष्ट्रात माकडांचा खेळ सुरू आहे, एका…”, ओवेसींची शिवसेनेतील बंडखोरीवर खोचक प्रतिक्रिया!

यासंदर्भात बीडच्या परळी येथील शिरसाळा भागात लावलेले बॅनर्स सध्या चर्चेत आले आहे. कारण या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा भावी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच, एकनाथ शिंदेंना ‘लोकनाथ’ असं देखील संबोधण्यात आलं आहे. शिरसाळाचे शिवसैनिक नजीब शेख यांच्या माध्यमातून हे बॅनर लावण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
eknath shinde banner
एकनाथ शिंदेंचा ‘भावी उपमुख्यमंत्री’ असा उल्लेख करणारे बॅनर्स!

“एकनाथ शिंदे अनेक जातीधर्माच्या लोकांना, शिवसैनिकांना ते मदत करत असतात. आमदारांना सोबत घेऊन जाण्याचा त्यांचा योग्य निर्णय आहे”, असं नजीब शेख म्हणाले आहेत.