Eknath Shinde Slam Uddhav thackeray Over Anaconad Remerak : आज मुंबईतील वरळी डोममध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. मुंबईवर दोन व्यापाऱ्यांचा डोळा असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी जोरदार घणाघात केला. तसेच या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा ‘अॅनाकोंडा’ असा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर महायुतीमधील नेत्यांकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. यावर आथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या आरोपावर शिंदे म्हणाले की, “महापालिकेच्या निवडणुका येतात तेव्हा त्यांची ही टूम सुरू होते. मुंबई विकणार, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार… ही जूनी कॅसेट झाली आहे. आता त्यांनी नवीन स्क्रिप्ट रायटर शोधला पाहिजे,” असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
ॲनाकोंडा म्हणाल तर हे स्वतः ॲनाकोंडा आहेत. गेले २५ वर्ष मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर मोठा विळखा घालून बसले आहेत. या ॲनाकोंडाचं वैशिष्ट्य वेगळं आहे, याचं पोट भरत नाही. मुंबईची तिजोरी गिळली, मुंबई गिळली, मुंबईतील रुग्णांची खिचडी गिळली. मुंबईतले काही भूखंड गिळले. मिठीतला गाळ गिळला, रस्त्यातील डांबर गिळलं तरीही त्यांचं पोट भरत नाही. त्यामुळे हा भस्म्या रोग झालेला हा ॲनाकोंडा आहे. याचं पोट कधीच भरत नाही. भरणार नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
“मुंबईकरांना हे कळलं आहे की, मुंबई लुटण्याचं काम, गिळण्याचं काम, तिजोरी साफ करण्याचं काम ज्या लोकांनी केलं आहे, अगदी कोविडमधील खिचडी चोरण्याचं काम, डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाण्याचं काम, डांबरामध्ये, मिठीच्या गाळामध्ये पैसे खाण्याचं काम ज्यांनी केलं, त्यांना या निवडणुकीत मुंबईकर माफ करणार नाहीत. ही भीती त्यांना दिसू लागली आहे, म्हणून अशी टीका ते करत आहेत,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
मुंबईतील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी नाव न घेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, “आज एकजण मुंबईत येऊन गेले. योगायोग म्हणजे आज मी सामनामध्ये दोन बातम्या वाचल्या. पहिल्या पानावर भाजपा कार्यालयाचं उद्धघाटन आणि दुसऱ्या पानावर एक बातमी होती, त्यामध्ये जिजामाता उद्यानात लवकरच अॅनाकोंडा येणार, आता आपण पेंग्विन आणलं म्हणून लाखो पर्यटक तिकडे वाढले आणि मला त्याचा अभिमान आहे. पण पेंग्विनच्या उंचीची काही माणसे आपल्यावर टीका करतात ते सोडून द्या. पण अॅनाकोंडा म्हणजे सर्व काही गिळणारा साप होय आणि तो आज इकडे येऊन भूमिपूजन करून गेला. त्याला मुंबई गिळायची आहे. मुंबई गिळायची का? पाहतो कशी गिळणार. नाही पोट फाडून बाहेर आलो तर नाव सांगणार नाही”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
