Eknath Shinde उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख आज पुन्हा एकदा एसंशिं असा केला आणि त्यांना गद्दार म्हटलं. तसंच भाजपावर टीका करत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध केला. या सगळ्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारलं असता त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. तुमचा शॉर्टफॉर्म युटी होतो म्हणजे युज अँड थ्रो म्हणायचं का असा खोचक प्रश्नही एकनाथ शिंदेंनी विचारला.

बुधवारचा दिवस उबाठासाठी दुर्दैवी होता-एकनाथ शिंदे

बुधवारचा दिवस हा खऱ्या अर्थाने उबाठासाठी दुर्दैवी होता. वक्फ बोर्ड बिल आणि हिंदुत्वाचा संबंध नाही. ते म्हणतात की आमचा वक्फ बिलाला विरोध नाही भाजपाच्या ढोंगीपणाला विरोध आहे. अतिशय गोंधळलेल्या परिस्थितीत ते आहेत. काय बोलायचं, काय करायचं हे सुचत नसलेल्या स्थितीत उबाठा नेतृत्व दिसतं. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय अशी त्यांची अवस्था झाली आहे असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

राहुल गांधींची सावली मिळाल्याने उद्धव ठाकरेंना वारंवार जिनांची आठवण-एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे म्हणाले देशभक्त मुस्लिमांना बाळासाहेब ठाकरेंचा पाठिंबा होता. तिच भूमिका शिवसेनेची म्हणजे आमची तर आहेच पण भाजपाचीही आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भूमिका आहे. देशावर प्रेम करणाऱ्या मुस्लिमाला पाठिंबा आहे. देशविरोधी कृत्य करणारे कुणीही असो त्यांना विरोध आहे. हीच भूमिका वक्फ बोर्ड विधेयकाच्या माध्यमातून भाजपाने दाखवली. पण राहुल गांधींची सावली मिळाल्याने उबाठाला वारंवार जिनांची आठवण येते हे दुर्दैव आहे. आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. काय करायचं ते उद्धव ठाकरेंना सुधरत नाही.

वक्फ बोर्डाने बिल आल्याने मूठभर लोकांच्या हाती असलेल्या जमिनीवर चाप बसणारर आहे-शिंदे

उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली खरं म्हणजे अब्रू काढून घेण्यासारखंच आहे. वक्फ बोर्ड बिल आणल्याने काही मूठभर लोकांच्या हातात लाखो, करोडो एकर जमीन होती त्यांना चाप बसणार आहे. काँग्रेसच्या काळात जागा डीनोटिफाय करुन काही लोकांच्या घशात घातल्या. आता असं कुठलंही कृत्य करता येणार नाही. या जागांवर आता रुग्णालयं, शाळा होतील, लोकपयोगी कामं होतील. उद्धव ठाकरे म्हणाले हे भाजपाचं लांगूलचालन आहे. एकीकडे म्हणाले मुस्लिमांच्या बाजूने बोलत आहेत. उद्धव ठाकरेंना काय म्हणायचं तेच कळत नाही. गोंधळलेल्या अवस्थेत नेतृत्व गेलं की पक्षाचा इतिहास होतो असंही एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे विचार पुढे घेऊन जात आहोत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यू.टी म्हणजे काय युज अँड थ्रो का?

उद्धव ठाकरेंनी २०१९ ला खुर्चीसाठी जी तडजोड केली जी चूक केली जो अपराध केला त्यापेक्षा मोठा अपराध हा बुधवारी केला. दरम्यान उद्धव ठाकरे तुमचा उल्लेख एसंशि करत आहेत. असं विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले एसंशि म्हणजे काय? एकनाथ संभाजी शिंदे. बरं, शॉर्टकट मी असं म्हणू का की त्यांचा शॉर्टकट यु.टी. म्हणजे युज अँड थ्रो. वापरा आणि फेका ही त्यांची नीती आहे. मला बोलायला लावू नका माझ्याकडे बोलण्यासारखं खूप आहे. मला गद्दार, गद्दार म्हटलं, खोके खोके म्हटलं. महाराष्ट्रातल्या जनेतेने तुम्हाला खोक्यांमध्ये बंद करुन टाकलं. १०० पैकी २० च आमदार आले. ते पण आमच्या काही लोकांच्या चुका झाल्याने आले. गद्दार कोण आणि खुद्दार कोण? याचा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत दिला आहे. उद्धव ठाकरे हिंदू असो की मुस्लिम दोन्ही समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उबाठा करते आहे हे जनतेला माहीत आहे. त्यामुळे घर का ना घाटका अशी परिस्थिती उद्धव ठाकरेंची झाली आहे. असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.