Eknath Shinde visit Raj Thackeray House: गणेशोत्सवाच्या निमित्ताने राजकीय नेते हे एकमेकांच्या घरी सदिच्छा भेट देत असतात. मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी काल गणेश चतुर्थीच्या दिवशी उद्धव ठाकरे उपस्थित राहिले होते. या भेटीची चर्चा दिवसभर झाली. त्यानंतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरेंच्या दादरमधील निवासस्थानी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. यानंतर बाहेर माध्यमांशी बोलत असताना त्यांनी सूचक विधान केले.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मराठी भाषा सक्ती आणि त्यानंतर काही कौटुंबिक प्रसंगात दोन्ही चुलत भाऊ एकत्र आले आहेत. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी मातोश्री या निवासस्थानाला अनेक वर्षांनंतर भेट दिली होती. तर उद्धव ठाकरेंनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पहिल्यांदाच गणपतीचे दर्शन घेतले. दोन्ही नेत्यांच्या एकत्र येण्यावर शिवसेना (शिंदे) पक्षाकडून नापसंती किंवा टिकात्मक प्रतिक्रिया देण्यात येत होत्या. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंच्या घरी जाणे, चर्चेचा विषय ठरत आहे.
एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेतल्यानंतर बाहेर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अनेक राजकीय प्रश्न विचारण्यात आले. यावर त्यांनी सूचक विधान केले. एकनाथ शिंदे म्हणाले, “मी दरवर्षी गणपती दर्शनासाठी इथे येतो. पण यावर्षी आम्ही काही नवीन लोक पाहिले. याचा खूप आनंद झाला.”
गणरायाला काय साकडे घातले, असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता एकनाथ शिंदे म्हणाले, बाप्पाला साकडे घालण्याची गरज नाही. बाप्पाला सर्व माहीत आहे. माझे एकच मागणे असते की, महाराष्ट्रावरची सर्व विघ्न दूर व्हावीत. अन्नदाता शेतकऱ्याला सुखी ठेव, त्याची भरभराट होऊ दे आणि उन्नती होऊ दे, अशी प्रार्थना मी नेहमी करत असतो.
‘राज’ की बात राहुद्या
राज ठाकरेंच्या घरी भेट दिल्याचा कोणताही राजकीय अर्थ काढू नका, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच माध्यमांना सर्वच सांगायचे नसते. काहीतरी ‘राज’ की बात राहुद्या, असे सांगून एकनाथ शिंदे यांनी आतली चर्चा सांगण्याचा प्रश्न टोलवून लावला.

उद्धव ठाकरेंना लगावला टोला
उद्धव ठाकरे हे २२ वर्षांनंतर राज ठाकरेंच्या घरी आले. या भेटीकडे तुम्ही कसे पाहता? असा प्रश्न यावेळी एकनाथ शिंदेंना पत्रकारांनी विचारला. यावर ते म्हणाले, मी तर नेहमीच राज ठाकरेंच्या घरी येत होतो. यावेळी काही नवीन लोक आले. गणपती बाप्पाने सर्वांना सुबुद्धी आणि सदबुद्धी द्यावी. अदखलपात्र लोक दखल घ्यायला लागले, ही चांगली गोष्ट आहे. कुठलेही कुटुंब एकत्र येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. त्याचे स्वागत केले पाहिजे.