scorecardresearch

शिंदे vs ठाकरे: “धनुष्यबाण आमच्याकडे आला तर…”; पक्षचिन्ह ‘१०० टक्के आम्हाला मिळेल’ म्हणत शिंदे गटाचं विधान

खरी शिवसेना कोण? पक्ष चिन्ह धनुष्यबाण कोणाला मिळणार यासंदर्भातील सुनावणी निवडणूक आयोगासमोर होणार आहे.

शिंदे vs ठाकरे: “धनुष्यबाण आमच्याकडे आला तर…”; पक्षचिन्ह ‘१०० टक्के आम्हाला मिळेल’ म्हणत शिंदे गटाचं विधान
पत्रकारांशी बोलताना केलं विधान

सर्वोच्च न्यायालयामधील सुनावणीमध्ये मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला मोठाला दिलासा मिळाला. निवडणूक आयोगासमोर खरी शिवसेना कोण यासंदर्भातील सुनावणी घेण्यात यावी यासंदर्भातील मागणीला स्थगिती देण्यात यावी ही उद्धव ठाकरे गटाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळेच आता खरी शिवसेना कोण? पक्ष चिन्ह धनुष्यबाण कोणाला मिळणार यासंदर्भातील सुनावणी निवडणूक आयोगासमोर होणार आहे. या निकालानंतर सर्वच स्तरांमधून प्रतिक्रियांचा पाऊस पडल्याचं चित्र पहायला मिळालं. लवकरच ही सुनावणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाकडून ‘१०० टक्के आम्हालाच धनुष्यबाण मिळेले’ असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. इतकच नाही तर निवडणुकीच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरे गटातील आणखीन आमदार, खासदार फुटून शिंदे गटात येतील असंही सांगण्यात आलं आहे.

नक्की वाचा >> Dasara Melava: ‘१४ कोटी जनतेचे प्रमुख’ अशी आठवण करुन देत पवारांचा CM शिंदेंना सल्ला; म्हणाले, “ते पक्षाचे प्रमुख असतील पण…”

शिंदे गटातील बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना निवडणूक आयोगासमोरील या सुनावणीसंदर्भात भाष्य करताना धनुष्यबाण हे चिन्ह शंभर टक्के शिंदे गटालाच मिळणार असा विश्वास व्यक्त केला आहे. जाधव यांनी उद्धव ठाकरे गटातील काही आमदार आणि खासदार संपर्कात असल्याचा दावा केला. पत्रकारांशी चर्चा करताना त्यांनी निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटातील तीन खासदार आणि चार आमदार शिंदे गटात येतील असा दावा केला आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांना नेमके किती खासदार संपर्कात आहेत याबद्दल प्रश्न विचारला असता जाधव यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाचा संदर्भ दिला.

नक्की वाचा >> Dasara Melava: ‘काल रात्री या…’; शिंदे गटात जाण्याची चर्चा असतानाच मिलिंद नार्वेकरांनी शेअर केले फोटो

शिंदे गटात सामील झाल्याने पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत उद्धव ठाकरेंच्या आदेशाने बुलढाणा संपर्क प्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्यानंतर जाधव यांनी शिवसेनेविरोधात दंड थोपटले. “काही खासदार आमच्या संपर्कात आहेत. त्यांच्याकडे असलेल्या १५ आमदारांपैकी काही आमदार वेगवेगळ्या लोकांच्या तसेच एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत,” असा दावा जाधव यांनी केला आहे. तसेच यासंदर्भातील उदाहरण देताना त्यांनी गजानन किर्तीकर यांचा उल्लेख केला. “उदाहरण सांगायचं झाल्यास, उद्धव ठाकरेंनी गटनेत्यांचा मेळावा घेतला त्यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेवरुन लक्षात आलं असेल. त्यांनी हेच म्हटलं होतं की शिवसेना-भाजपाचीच युती असली पाहिजे कारण ही नैसर्गिक युती आहे,” असंही जाधव यांनी म्हटलं.

नक्की वाचा >> थंड पाण्याची बाटली, लोणावळ्यातील हॉटेल अन् थेट CM शिंदेंच्या हत्येचा कट रचल्याचा फोन; ‘त्या’ कॉलमागील खरा घटनाक्रम

‘किती खासदार संपर्कात आहेत?’ या प्रश्नाला उत्तर देताना जाधव यांनी निवडणूक आयोगातील खरी शिवसेना कोणती यासंदर्भातील वादावर सुरु होणाऱ्या सुनावणीचा उल्लेख केला. “आज तर नाही पण ज्या दिवशी निवडणुका जाहीर होतील तेव्हा त्यातील तीन ते चार खासदार (आमच्याकडे येतील.) निवडणूक आयोग काय निर्णय देणार यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत,” असं जाधव म्हणाले आहेत. “धनुष्यबाण आम्हाला १०० टक्के मिळेल अशी अपेक्षा आहे. आमचा दावा तितका मजबूत आहे. तितके पुरावे आम्ही निवडणूक आयोगाकडे सादर केलेले आहेत. धनुष्यबाण आमच्याकडे आला तर तिकडं काहीच शिल्लक राहणार नाही एवढी गोष्ट नक्की आहे,” असंही जाधव यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या