अहिल्यानगर: महापालिकेने आज, शुक्रवारी शहरातील प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. शहराच्या पुणे रस्त्यावरील कायनेटिक चौक, बसस्थानक रस्ता, लालटाकी परिसरातील अतिक्रमणे हटवली तर काही ठिकाणी रस्त्यावरील साहित्य जप्तही केले. नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढावीत अन्यथा कारवाई करण्याचा इशारा मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.
शहरातील स्वच्छता व अतिक्रमणे यासाठी काल, गुरुवारी आमदार संग्राम जगताप व आयुक्त डांगे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर मनपा प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या. आज सकाळपासून शहरातील प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. कायनेटिक चौक, बसस्थानक रोड, लालटाकी आदी परिसरातील अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. सुमारे ४० हून अधिक अतिक्रमणे काढण्यात आली.
कायनेटिक चौकातून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली. चौकालगत असलेल्या टपऱ्या, दुकानांसमोरील पत्र्याचे शेड जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आले. त्यानंतर सक्कर चौकापासून महावीर कलादालन, बाजार समिती चौकापर्यंत अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. तेथील रस्त्यावरील हातगाड्या हटवण्यात आल्या. लालटाकी-अप्पू चौकातील दुकानदारांनी रस्त्यावर साहित्य टाकून अतिक्रमण केले होते. तेही पथकाने कारवाई करून जप्त केले.
शहरात सुरू असलेली अतिक्रमण हटाव मोहीम आणखी काही दिवस सुरूच राहणार आहे. अतिक्रमणे स्वतःहून काढून न घेतल्यास महापालिका जेसीबीच्या सहाय्याने ती हटवेल. यात नुकसान झाल्यास मनपा जबाबदार राहणार नाही, असेही आयुक्त डांगे यांनी सांगितले.
मनपाने यापूर्वीही शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. सलग महिनाभर ही मोहीम सुरू होती. मात्र कारवाईमध्ये सातत्य नसल्याने रस्त्यांवर पुन्हा टपऱ्या उभारल्या जातात, अतिक्रमणे केली जातात. अतिक्रमणे हटवण्यासाठी पूर्वी कायमस्वरूपी पथके नियुक्त असत. मात्र आता या पथकांचे अस्तित्व राहिलेले नाही. केवळ आरडाओरडा झाला की पुन्हा मोहिमेला सुरुवात होते. दोन-चार दिवसातच ती पुन्हा थंडावते. कालही आमदार जगताप यांनी झाडझडती घेतल्यानंतर आज मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
वेळोवेळी राबवल्या गेलेल्या मोहिमेत केवळ टपऱ्या हटवल्या गेल्या, पक्की बांधकामे मात्र तशीच राहिली आहेत, त्याकडे मात्र मनपा यंत्रणेची दुर्लक्ष आहे. सध्या मनपामध्ये प्रशासकीय राजवट आहे. सभागृह अस्तित्वात नसल्याने नगरसेवकही मोहीम राबवण्यात हस्तक्षेप करत नाहीत. परिणामी मनपाला मोहीम राबवण्यात फारसे अडथळे नाहीत. तरीही अतिक्रमण हटवण्यात सातत्य दिसत नाही. बाजारपेठेतील दुकानांपुढे लोखंडी जाळ्या टाकून रस्ते अडवले जातात. त्यापुढे ग्राहकांची वाहने लागतात. त्यामुळे वाहतुकीस अधिकच अडथळे निर्माण होतात.
