येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर याच्याकडे तब्बल पावणे नऊ कोटी रुपयांची रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने तर शाखा अभियंता जगदीश वाघ याच्याकडे ८७ लाख रुपयांची मालमत्ता आढळून आल्याचे प्राथमिक छाननीत स्पष्ट झाले आहे. एका कार्यकारी अभियंत्याकडील डोळे दीपविणाऱ्या मायेने सार्वजनिक बांधकाम विभागातील टक्केवारीच्या कारभारावर प्रकाश टाकला आहे.
ठेकेदाराचे देयक मंजूर करण्यासाठी २२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग कार्यालयातील कार्यकारी अभियंता सतीश मधुकर चिखलीकर आणि शाखा अभियंता जगदीश वाघ यांना पकडण्यात आले होते. या कारवाईनंतर अस्वस्थ वाटू लागल्याने ते शासकीय रुग्णालयात दाखल झाले. परिणामी, त्यांना अटकही करता आली नव्हती. गुरुवारी रुग्णालयातून सोडल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक करत छाननीची प्रक्रिया सुरू केली. चिखलीकर याच्या घराच्या झडतीत आधीच दोन कोटी ९६ लाख रुपये रोख, २७ तोळे सोने आणि मालमत्तेची मोठय़ा प्रमाणात कागदपत्रे सापडली होती. बँकेतील ‘लॉकर’च्या तपासणीत साडे चार कोटी रुपये रोख आणि चार किलो २५० ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे सापडली. त्यांच्या इतर दागिन्यांचे मोजमाप करण्याचे काम अजूनही सुरू आहे. या बाबतची माहिती पोलीस अधीक्षक शशिकांत महावरकर यांनी दिली. चिखलीकरप्रमाणेच वाघ या शाखा अभियंत्यानेही स्थावर मालमत्तेत मोठी गुंतवणूक केली. त्याच्याकडे ४७ लाख रोख व एक किलो ११७ ग्रॅम सोने आढळून आले. त्याच्या मालमत्तेची अंदाजित किंमत ८६ लाखांहून अधिक असल्याचे या विभागाने म्हटले आहे. या दोन अभियंत्यांकडे मिळालेली मालमत्ता पाहून खुद्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागही चक्रावून गेला आहे. या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागातील अर्थपूर्ण व्यवहार उजेडात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd May 2013 रोजी प्रकाशित
लाचखोर अभियंत्याकडे कोटय़वधींची माया
येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर याच्याकडे तब्बल पावणे नऊ कोटी रुपयांची रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने तर शाखा अभियंता जगदीश वाघ याच्याकडे ८७ लाख रुपयांची मालमत्ता आढळून आल्याचे प्राथमिक छाननीत स्पष्ट झाले आहे. एका कार्यकारी अभियंत्याकडील डोळे दीपविणाऱ्या मायेने सार्वजनिक बांधकाम विभागातील टक्केवारीच्या कारभारावर प्रकाश टाकला आहे.
First published on: 03-05-2013 at 02:38 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Engineers arrested for taking bribe earn huge money and property