माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांची आज काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड    झाल्याचे जाहीर होताच शिर्डीसह राहाता तालुक्यात त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष साजरा केला.
काँग्रेस पक्ष विधिमंडळ गटनेतेपदी आमदार राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात व पतंगराव कदम या तीन नेत्यांमध्ये चुरस होती. पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे राज्याचे लक्ष लागून होते. परंतु काँग्रेसश्रेष्ठींनी विखे यांच्या गुणवत्तेची दखल घेत त्यांच्या गळय़ात गटनेतेपदाची माळ घातली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार विखे यांना काँग्रेस पक्षात जिल्ह्यात व राज्यात एक क्रमांकाचे मताधिक्य मिळाले होते. विखे हे सहाव्यांदा विधानसभेत विजयी झाले आहेत. आ. विखे यांच्या कार्याची दखल घेत काँग्रेस पक्षाने त्यांना गटनेतेपदाचा मान दिला. त्याच्या निवडीचे वृत्त आज जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला. त्यांच्या निवडीमुळे राज्यात व जिल्ह्यात काँग्रेस संघटना अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला.