पर्यावरण रक्षणासाठी लोकशिक्षण ही काळाची गरज असून, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास गांभीर्याने घेऊन पर्यावरण जागृतीसाठी व्यापक मोहीम आत्तापासूनच हाती घ्यावी लागणार असल्याचे मत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे यांनी केले.
येथील एन्व्हायरो फ्रेन्डस नेचर क्लबतर्फे पर्यावरण मित्र प्रदूषण मुक्त शाळांना पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी येथील यशवंतराव चव्हाण बचत भवनामध्ये पार पडला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे होते. तर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत रोडे, शिक्षण विस्तार अधिकारी नितीन जगताप, वन विभागाचे डी. के. जाधव, इन्व्हायरो क्लबचे अध्यक्ष प्रा. जालिंदर काशिद यांची उपस्थिती होती.
संजय भुस्कुटे म्हणाले, विज्ञान युगात स्वातंत्र्य हा स्वैराचार झाला आहे. माणूस एकमेकांपासून दुरावत चालला आहे. या परिस्थितीत लोकशिक्षणाच्या माध्यमातून जागृती होणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने एन्व्हायरो फ्रेड्स क्लबचे उपक्रम मोलाचे असून, या स्पर्धा पुणे विभाग स्तरावर घेण्यात याव्यात.
मितेश घट्टे म्हणाले, की वृक्षवल्ली आम्हा सोयरे या संतांच्या शिकवणीपासून आपण बाजूला चाललो आहोत. आधुनिकता पर्यावरणाच्या मुळावर उठली आहे. निसर्गचक्र बदलत आहे. दुर्मिळ पक्षी नामशेष होत आहेत. याचे भान ठेवून पर्यावरण रक्षणाची जाणीव निर्माण करावी लागेल, तरच विवेकानंद यांच्या स्वप्नातील बलशाली भारत आपण घडवू शकू.
प्रशांत रोडे म्हणाले, की पर्यावरण रक्षणासाठी विद्यार्थ्यांनी उचलेले पाऊल खूपच आशादायी आहे. या उपक्रमांसाठी आवश्यक ते सहकार्य पालिकेच्या माध्यमातून केले जाईल. नितीन जगताप यांनी एन्व्हायरो फ्रेंडस क्लबच्या उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले. प्रास्ताविकात प्रा. जालिंदर काशिद यांनी क्लबमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. पर्यावरण जागृतीसाठी विद्यार्थी व शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी क्लबचे उपाध्यक्ष प्रकाश खोचिकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले. पाहुण्यांच्या यशस्वी शाळांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. स्पध्रेत प्राथमिक विभागात नगरपरिषद शाळा क्रमांक ३ ने प्रथम क्रमांक मिळवला. सरस्वती विद्यामंदिर द्वितीय, नगर पालिका शाळा ९ तृतीय, का. ना. पालकर शाळा नं. २ उल्लेखनीय, माध्यमिक विभागात सरस्वती विद्यामंदिर प्रथम, लाहोटी कन्याशाळा द्वितीय, विठामाता विद्यालय तृतीय, केशवराव पवार इंग्लिश मीडियम उल्लेखनीय आणि टिळक हायस्कूल विशेष उल्लेखनीय.