शरद पवारांच्या मागे सगळे माजी आमदार बसले आहेत. आणि त्यांचे नातू पुढे उभे आहेत. ती पिढी तुमच्यासोबत लढली आणि त्यांची नातवं तुमच्यासाठी लढायला तयार झाले, असा एल्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज बीडमधून केले. शरद पवारांचा आज बीडमध्ये दौरा आहे. येथे ते जनसमुदायाला संबोधित करणार आहेत. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनीही संभाषण केले.

“जो नैसर्गिक नियम आहे की मुलगा सोडून गेला तरी नातू आजोबाला सोडत नसतो. साहेब इथे बसलेली सगळी नातवं तुम्हाला धरून चालणार आहेत”, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. “तुम्हाला पुढे करून बीड जिल्ह्याचा माहौल शरद पवारमय करायचा आहे. बीड हा भगवान बाबांचा जिल्हा. समतेचे पुजारी असलेल्या भगवान बाबांचा जिल्हा आहे. बीड गोपिनाथ मुंडेंचा जिल्हा. आपल्याला माहितेय गोपिनाथ मुंडे यांच्यासोबत अतिशय चांगले संबंध. मी विरोधी पक्षात असताना माझ्यावर केस झाली तेव्हा माझी पत्नी त्यांना भेटायला गेली. तेव्हा त्यांनी विचारलं, ‘जितेंद्र का नाही आला?’ तर ‘त्याला लाज वाटते, त्यांनी तुमच्या घरावर मोर्चा आणला होता’, असं माझी बायको म्हणाली. ते म्हणाले, ‘वेडा आहे तो, राजकारणात हे सर्व करायचं असतं. पण त्याच्यावर खोटी केस पडली, त्याचं आयुष्य बरबाद होऊ देणार नाही, त्याची केस एक मिनिटांत मागे घ्यायला लावतो.’ याच गोपिनाथ मुंडेंनी माझ्यावर स्वकियांनी केलेली केस १५ दिवसांत मिटवून फाईल फेकून दिली”, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.