नगर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे भ्रष्ट उमेदवार दिलीप गांधी यांची पाठराखण करणारे नरेंद्र मोदी देशाला काय भ्रष्टाचारमुक्त करणार, असा सवाल अपक्ष उमेदवार, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला. मोदी यांच्या येत्या दि. १२ ला नगर येथे होणाऱ्या सभेत लोकशासन पक्षाचे कार्यकर्ते गांधी यांच्या घाऊक भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे सादर करून त्यांना जाब विचारतील, असा इशाराही कोळसे यांनी या वेळी दिला.
पत्रकार परिषदेत कोळसे यांनी गांधी यांच्या भ्रष्टाचाराबद्दल निवेदनच प्रसिद्धीस दिले आहे. या निवेदनात नगर अर्बन बँकेसह गांधी यांच्या अन्य व्यवसायांमधील भ्रष्टाचाराची माहिती देण्यात आली आहे. निवेदनात कोळसे यांनी म्हटले आहे, की गांधी यांच्यासारख्या भ्रष्टाचाऱ्याला निवडून देणे ही नगर लोकसभा मतदारसंघाची अप्रतिष्ठा आहे. नगर शहर व या लोकसभा मतदारसंघाला मोठी व वैभवशाली राजकीय परंपरा आणि इतिहास आहे. स्वातंत्र्य चळवळीत पटवर्धन बंधूंनी राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केले. सेनापती बापट, क्रांतिकारी हबीब खान, आर. आर. पिल्ले, कॉ. भास्करराव जाधव, कॉ. मधुकर कात्रे, भाऊसाहेब-मोतीभाऊ-नवलमलजी फिरोदिया, डॉ. निसळ, बाळासाहेब भारदे, मधू दंडवते, जानकीबाई आपटे, जानकीबाई कवडे, नवनीतभाई बार्शीकर, माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब शिंदे, आबासाहेब निंबाळकर अशा दिग्गजांनी शहराला व जिल्हय़ालाही पुरोगामी राजकीय चेहरा दिला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पोपटराव पवार हेही याच भूमीतील आहेत. गांधी यांनी मात्र या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना या परंपरेला हरताळ फासला आहे.
नगर शहर आणि लोकसभा मतदारसंघाची सद्य:स्थिती विदारक आहे. मूठभर गुन्हेगार आणि भ्रष्टाचारी टोळय़ांनी समाजाला वेठीस धरले आहे. गांधी यांच्या काळात नगर अर्बन बँकेत महाघोटाळा झाला. गांधी स्वत: आणि त्यांच्याशी संबंधित संचालकांनी केलेली अफरातफर, पैशाचा कुटुंबीयांसाठी गैरवापर आदी अनेक मुद्दय़ांवर राज्याच्या विधानसभेत चर्चा होऊन या सर्वावर फौजदारी कारवाई करून त्यांना तुरुंगात पाठवण्याचा ठरावही पारित झाला आहे. उच्च न्यायालयानेदेखील या कारवाईला संमती दिली आहे. त्यांच्या मालकीच्या मे. मनसुखलाल दूध प्रकल्पातही त्यांची मुले व अन्य कुटुंबीयांनी अर्बन बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना दमबाजी करून बँकेची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. बँकेच्या अन्य व्यवहारांतही मोठा गैरकारभार सुरू असल्याचे नमूद करून त्या अनुषंगाने अनेक मुद्दे या निवेदनात उपस्थित करण्यात आले आहेत.
भाजप-शिवसेना युतीच्या नेत्यांनीच गांधी यांच्या या भ्रष्ट कारभाराला वाचा फोडली. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, भाऊसाहेब फुंडकर, आमदार राम शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे, ज्येष्ठ नेते अभय आगरकर यांनीच गांधी यांच्या भ्रष्टाचाराकडे पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधले होते. अनिल राठोड व विजय औटी या शिवसेनेच्या आमदारांनीही गांधी यांच्या भ्रष्टाचाराबद्दल राज्य सरकारकडे तक्रारी केल्या आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने या गोष्टी आता आपण थेट जनतेसमोर नेणार असून मतदारांनीच गांधी यांचा खरा चेहरा लक्षात घ्यावा असे आवाहन कोळसे यांनी केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Apr 2014 रोजी प्रकाशित
‘मोदींच्या सभेत भ्रष्टाचाराचे पुरावे मांडणार’
नगर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे भ्रष्ट उमेदवार दिलीप गांधी यांची पाठराखण करणारे नरेंद्र मोदी देशाला काय भ्रष्टाचारमुक्त करणार, असा सवाल अपक्ष उमेदवार, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला.
First published on: 11-04-2014 at 03:42 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Evidence of corruption will put at a meeting of narendra modi