सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी आज काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ३१ मे रोजी अक्कलकोटमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. ही माहिती स्वतः म्हेत्रे यांनी दिली. त्यांच्या या निर्णयामुळे अक्कलकोट भागात काँग्रेस पक्ष नामशेष होण्याची चिन्हे दिसत आहेत.
सिद्धाराम म्हेत्रे यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय जाहीर केला. अक्कलकोट तालुक्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात मोठा दरारा ठेवलेले आणि दुधनी नगर परिषदेचे तब्बल ५० वर्षांहून अधिक काळ नगराध्यक्ष राहिलेले दिवंगत वादग्रस्त नेते सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे सिद्धाराम म्हेत्रे हे चिरंजीव आहेत. ते चार वेळा आमदार, तर एकवेळ गृह व ग्रामविकास खात्याचे राज्यमंत्री होते. विधानसभा निवडणुकीत त्यांचा तीन वेळा पराभवही झाला होता. अलीकडे त्यांच्या मातोश्री साखर कारखान्यासह अन्य संस्थांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. विशेषत: त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे वजनदार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर म्हेत्रे यांचा रोष आहे. त्यांच्याच दबावामुळे आपल्या साखर कारखान्याच्या मालमत्तेवर बँकांची जप्तीसह इतर कारवाई झाल्याचा आरोप म्हेत्रे हे करीत आले आहेत. या अडचणीतून सुटका करवून घेण्यासाठी आणि अक्कलकोटचा विकास करण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याची तयारी म्हेत्रे यांनी चालविली होती. त्याचा मुहूर्त बुधवारी साधण्यात आला.
सहकारी कार्यकर्त्यांच्या दबावामुळे केवळ नाईलाज म्हणून आपणास पक्ष सोडावा लागत आहे. पडत्या काळात ज्यांनी आपणास त्रास दिला, ते आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या भाजपच्या अधिपत्याखालील महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात जात असताना, आता आमदार कल्याणशेट्टी यांच्यासारख्या शत्रुबरोबरही मैत्रीचा प्रयोग करून पाहू. चांगला प्रतिसाद मिळाला तर ठीक, अन्यथा पुढे दुसरा राजकीय निर्णय घेण्यास आपण या मोकळे असू, असेही सूचक विधान त्यांनी केले. अक्कलकोट तालुक्यात काँग्रेसची उरलीसुरली ताकद म्हेत्रे यांच्यावर अवलंबून होती. ते पक्षाची साथ सोडत असल्यामुळे तालुक्यात काँग्रेस नामशेष होण्याची चिन्हे दिसत आहेत.
अडचणीच्या काळात पक्षाकडून दुर्लक्ष
कांग्रेस पक्षावर वा नेत्यांवर नाराज नाही. मात्र आपल्या अडचणीच्या काळात आपणास पक्षाकडून ताकद मिळाली नाही. भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना त्यांच्या पक्षाने जशी ताकद दिली, तशी ताकद २००९ नंतर पडत्या काळात काँग्रेस पक्षाकडून मिळाली नसल्याची खंत म्हेत्रे यांनी व्यक्त केली.
काँग्रेसमध्ये भवितव्य नसल्याने पक्षांतर
काँग्रेसचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यावर बोलताना त्यांचे राजकीय विरोधक, भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली. यापूर्वी दोनवेळा विधानसभा निवडणुकीत म्हेत्रे यांचा ४० हजार ते ५० हजार मतांच्या फरकाने पराभव झाला होता. त्यामुळे काँग्रेसमध्ये राहून भवितव्य नाही, याची जाणीव झाल्याने त्यांनी हिंदुत्ववादी विचार स्वीकारून शिवसेना शिंदे पक्षात जाण्याचा निर्णय घेतला असावा. तसे असेल तर त्यांचे स्वागत आहे. परंतु अवैध धंद्यांसह आक्षेपार्ह प्रकारांना सत्ता संरक्षण मिळण्यासाठी जर ते भाजपच्या मित्र पक्षात येत असतील तर ते आपण कदापि मान्य करणार नाही, अशी भूमिका आमदार कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केली.