|| मोहन अटाळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अतिवृष्टी, दरही कमी; उत्पादक शेतकऱ्यांसमोर संकट

अमरावती : राज्यभरात नागपुरी संत्र्यांच्या नावाने प्रसिद्ध असलेली अमरावती जिल्ह्यातील बहुतांश संत्री यंदा मातीमोल झाली आहेत. अतिवृष्टी, फळगळती आणि अल्प बाजारभाव यामुळे हजारो क्विंटल संत्री रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी, अचलपूर, अंजनगाव, परतवाडा, तिवसा या तालुक्यांमध्ये संत्र्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते. यंदा राज्यभर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. विदर्भातसुद्धा मधल्या काळात सतत पंधरा दिवस सूर्याचे दर्शनसुद्धा झाले नाही.

यामुळेच संत्र्याच्या देठावर बुरशीजन्य आजाराने हल्ला केला. संत्र्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली. याच कालावधीत संत्र्याचे व्यापारीसुद्धा शेतमालाकडे दुर्लक्ष करू लागले होते. त्यामुळे हजारो क्विंटल संत्रा शेतात पडून सडला. जो संत्रा झाडावर राहिला त्याची प्रतवारी घसरली.

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणारा संत्रा यंदा हातातून गेल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. संत्र्याच्या उत्पन्नावरच शेतकऱ्याचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते. मात्र, याच संस्थेने यंदा दगा दिल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोसळले आहे. संत्री पिकवणारे शेतकरी मागील अनेक वर्षांपासून संकटाच्या फेऱ्यात अडकले आहेत.

सततच्या पावसामुळे आंबिया संत्र्यांचे उत्पादन कमी आहे. गुणवत्तेअभावी योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी हा संत्रा रस्त्याच्या कडेला फेकणे सुरू केले आहे. योग्य भाव नसल्याने विदर्भातील अनेक बाजार समित्यांच्या आवारात पडून असलेली संत्रीही सडू लागली असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. संत्र्याला पाच वर्षांनंतर प्रथमच अतिशय कमी भाव मिळत असल्याचे चित्र आहे. नैसर्गिक आपत्ती आणि सततच्या पावसामुळे काही भागांत कीटकांचा (पतंग) प्रादुर्भाव झाल्यामुळे दोनतृतीयांश संत्री खराब झाली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. इंधनाचे वाढलेले भाव आणि वाढलेले मजुरीचे दर यामुळे तोडणी आणि वाहतूक परवडत नाही. त्यामुळे शेतकरी हैराण आहेत. अनेकांनी संत्र्यांची तोडणी थांबवली. यंदा संत्र्याचा अंबिया बहार मोठ्या प्रमाणावर आला आहे. संत्र्याचे उत्पादन त्यामुळे चांगले झाले.

शेतकऱ्यांनी संयम ठेवावा

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून जिल्ह्यातील संत्रा उत्पादनावर अवकळा आली आहे. परिणामी अपार कष्टातून हाती आलेले संत्र्याचे पीक कोणत्या ना कोणत्या कारणाने निसटून जात आहे. पूर्वीच्या तुलनेत यंदा संत्र्याच्या फळ गळतीचे प्रमाण वाढत असल्याने वैतागलेले शेतकरी आता संत्र्याच्या बागा उद्ध्वस्त करीत आहेत.  शासन, संशोधक व शेतकरी यांच्या समन्वयातून या संकटावर मात करण्यासाठी एक नियोजन आराखडा तयार करण्यात आल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी फळबागा उद्ध्वस्त न करता संयम ठेवावा, लवकरच नियोजन होईल असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

 शेतकरी आर्थिक गुंतवणूक व अपार कष्ट करीत चांगल्या उत्पन्नाची आशा करीत असतात. मात्र, संत्रा पीक होती येत असतानाच कोणत्या ना कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे संत्रा फळ गळती सुरू होते. काही प्रमाणात संत्रा गळती अपेक्षित असली तरी मागील दोन ते तीन वर्षांपासून फळगळती वाढली आहे. शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाची दखल घेत दोन दिवसांपूर्वी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संत्री उत्पादक शेतकऱ्यांशी भेट घेत त्यांच्याशी  संवाद साधला. बच्चू कडू यांनी अकोला येथील डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ व फळबागतज्ज्ञांशी चर्चा के ली.

यावर लवकरात लवकर उपाययोजना अमलता आणण्याचे निर्देश त्यांनी दिले या वेळी बैठकीला विद्यापीठातील फळशास्त्र विभागाचे डॉ. शशांक भराड, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. दिनेश पैठणकर, डॉ. उज्ज्वल राऊत व डॉ. राजेंद्र वानखडे उपस्थित होते. संत्री उत्पादनाच्या संदर्भात शेतकऱ्यांना माहिती देण्याकरिता तालुकास्तरावर शेतकऱ्यांसाठी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

आता या प्रशिक्षण शिबिरांची व्याप्ती वाढणार आहे. प्रामुख्याने संशोधनातून शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादन मिळावे याकरिता कृषी विद्यापीठ व शाखास्तरावरून कार्य होत आहे. मात्र शासन, संशोधन (विद्यापीठ) आणि शेतकरी यांच्यातील समन्वयामध्ये तफावत असल्याने शेतकऱ्यांना शेती व पीकसंदर्भात विविध समस्यांचा समाना करावा लागतो. ही तफावत दूर करण्यासाठी प्रयत्न आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त के ले आहे.

जिल्ह्यातील संत्री फळांना लागलेली गळती यावर एक सक्षम असा नियोजन आराखडा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार शासन, प्रशासन (कृषी विद्यापीठ) व शेतकरी यांचा समन्वय घालण्यावर प्रयत्न होईल. कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, संशोधक व शेतीतज्ज्ञ आता थेट संत्रा बागांना भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. भेटीदरम्यान संत्र्याच्या पिकाची पाहणी, झाडांचे व मातीचे नमुने घेऊन त्यावर संशोधन करण्यात येणार आहे. संत्र्याची कलम, नर्सरी आणि बहार ते तोडणीपर्यंत संत्रा पिकाच्या स्वस्थ वाढीसाठी आवश्यक उपायोजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.     – बच्चू कडू, राज्यमंत्री

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Excessive rainfall low rates crisis in front of productive farmers orange akp
First published on: 03-11-2021 at 20:28 IST