भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्रातील पहिला कार्यक्रम जामखेड तालुक्यातील चौंडी येथे घेतला होता, तो त्यांचा शेवटचाच कार्यक्रम ठरला. त्याचीच हुरहुर चौंडीकरांना लागली आहे.
गेल्या शनिवारीच मुंडे चौंडीला येऊन गेले. त्यानंतर तीनच दिवसांनी मंगळवारी त्यांचे अपघाती निधन झाले. पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमासाठी मुंडे गेल्या शनिवारी चौंडीला आले होते. केंद्रीय ग्रामविकास मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर हा त्यांचा नगर जिल्हय़ातीलच नव्हेतर राज्यातील पहिलाच कार्यक्रम होता. दुर्दैवाने तोच शेवटचाही ठरला.
ताज्या आठवणींमुळे चौंडीकरांना मुंडे यांच्या निधनाची अधिक हुरहुर लागली. विशेष म्हणजे मुंडे त्या दिवशी भलतेच खुशीत होते. केंद्रात सत्तापरिवर्तन झाले, येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातही सत्तापरिवर्तन होणार असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचा झेंडा फडकणार असा दावा त्यांनी केला होता. तसेच केंद्राच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक तरतूद असलेले ग्रामविकास खाते आपल्याला मिळाले आहे, त्याचा पुरेपूर फायदा घेऊन ग्रामीण भागाचा चेहरामोहरा येत्या पाच वर्षांत बदलू असा संकल्पही त्यांनी या कार्यक्रमात सोडला होता.
चौंडी येथे मुंडे यांनी त्यांच्या राजकीय वारसदाराबाबतही भाष्य केले होते, त्यामुळे तर चौंडीकर अधिकच भावनिक झाले आहेत. आपल्याला मुलगा नसल्यामुळे महादेव जानकर हेच आपले राजकीय वारसदार आहेत असे सुतोवाच त्यांनी या कार्यक्रमात केले होते, त्यामुळेच या अपघाताची त्यांना चाहूल लागली होती की काय, अशी शंकाही आता उपस्थित होऊ लागली आहे. जानकर यांची त्यांनी येते मुक्तकंठाने स्तुतीही केली. बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचा त्यांचा निर्णय योग्यच होता. एका अर्थाने ते त्यात विजयी झाले आहेत, असे मुंडे म्हणाले होते. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करू असे आश्वासनही त्यांनी दिले होते.
कार्यक्रमानंतर मुंडे यांनी येथेच त्यांचे जुने सहकारी अण्णा डांगे यांचीही भेट घेतली होती. बीड, परळी येथील कार्यकर्तेही त्यांना भेटण्यासाठी मोठय़ा संख्येने येथे आले होते. या घाईच्या दौ-यातही त्यांनी हेलिपॅडवर या कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चाही केली. मुळातच चौंडीच्या विकासात मुंडे यांचाच पुढाकार होता. राज्यात युतीचे सरकार असताना त्यांनी हा पाया रोवला, त्यानंतर अनेक वेळा त्यांनी येथे भेटी दिल्या. अहल्यादेवींचाच आदर्श डोळय़ांसमोर ठेवून आम्ही केंद्रात राज्य कारभार करू, अशी ग्वाही मुंडे यांनी दिली होती. या सा-या ताज्या आठवणींनी चौंडीकर आता मात्र उद्विग्न झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expectancy to chaundi of gopinath munde tour
First published on: 04-06-2014 at 02:01 IST