गडचिरोली पोलिसांनी अटक केलेला मोस्ट वॉन्टेड जहाल नक्षलवादी राजू उर्फ जेठूराम धुर्वा याचा अकरा गुन्ह्य़ांमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता. त्याच्यावर पोलिस दलाने १६ लाखाचे बक्षीस ठेवले होते. या जहाल नक्षलवाद्याला अटक केल्याने नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला असून पोलिस दलाचे मनोबल उंचावले आहे.
गडचिरोली जिल्ह्य़ातील उपविभाग धानोरा अंतर्गत छत्तीसगड सीमेलगत गडचिरोली जिल्हा पोलिस नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना येनगाव जंगल परिसरात जहाल नक्षलवादी राजू उर्फ जेठूराम धुर्वा (४१,रा.खडगाव, ता.मोहला, जि.राजनांदगाव) याला अटक करण्यात आली. राजू जहाल नक्षलवादी असून तो मानपूर विभागाचा डीव्हीसी सदस्य असून औंधी एलओएस कमांडर आहे. २००७ नंतर प्रथमच जिल्हा पोलिस दलाला एवढा मोठा नक्षलवादी पकडण्यात यश प्राप्त झाले आहे. या अटकेमुळे औधी दलमला आता कोणीही मोठा नेता उरला नसून त्यांची मोठी पिछेहाट झाली आहे. गहनगट्टा चकमकीत या दलमचा उपकमांडर मारला गेला होता. त्यामुळे हा दल आता जवळ जवळ संपुष्टात आला आहे. छत्तीसगड व महाराष्ट्रातील अनेक गंभीर गुन्ह्य़ांमध्ये त्याचा सक्रीय सहभाग आहे. सावरगाव, मुरूमगाव, मुंगनेर, पेंढरी इत्यादी परिसरातील अनेक हिंसक घटनांमध्ये त्याचा सहभाग होता.
राजू धुर्वा दलममध्ये सक्रीय होण्यापूर्वी गावात राहून मिलिशिया सदस्य म्हणून काम करायचा. मानपूर विभाग एसझेडसी, पोलीस ब्युरो सदस्य गुडसा उसेंडी याने पाठवून दिलेले जिलेटीन व इतर स्फोटके, अन्य साहित्य वेगवेगळ्या दलांना पोहोचवण्यासाठी मदत करण्याचे काम तो प्रारंभी करायचा. सप्टेंबर २००७ मध्ये पल्लेमाडी दलममध्ये तो सक्रीय सदस्य म्हणून भरती झाला. २००८ मध्ये मोहल्ला एलओएस म्हणून बदली होऊन २०१२ पर्यंत या पदावर होता. २०१२ मध्ये वल्लेमाडी दलममध्ये डिव्हीसी म्हणून बदली होऊन २०१३ पर्यंत कार्यरत होता. २०१३ पासून ते अटकेपर्यंत औधी दलम प्रमुख म्हणून कार्यरत होता. त्याच्या विरुध्द ११ गुन्हे दाखल असून मुंगनेर चकमकीत त्यात प्रत्यक्ष सहभागी होता. वाहन जाळपोळ, जिलेटीन लूट, सोरपार खून, संबलपूर चकमक, पाडी व कंदाळी गावी हत्या, बुकमरका पहाडीत चकमक, लेकेपार येथे स्फोट, मुदेली, मर्दगुट्टा व मुंगनेर चकमकीत त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. त्याच्यावर पोलिस दलाने १६ लाखाचे बक्षीस ठेवले होते. त्याच्या अटकेने पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Extreme maoist raju arrested
First published on: 17-09-2014 at 12:57 IST