scorecardresearch

Maharashtra Politics: फडणवीस उद्याच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता; शिंदेंकडे सोपवली जाणार ‘ही’ जबाबदारी?

एकनाथ शिंदेंसोबत बंडखोर आमदार मध्यरात्री गोव्यात दाखल झाले असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांचं स्वागत केलं

Shinde And Fadnavis
शिंदेंना ३९ शिवसेना आमदारांचा पाठिंबा आहे (प्रातिनिधिक फोटो, फडणवीस यांचा फोटो दिपक जोशी यांच्या सौजन्याने, एकनाथ शिंदेंचा फोटो फेसबुकवरुन साभार)

उद्धव ठाकरे यांनी नऊ दिवसांच्या सत्तासंघर्षानंतर बुधवारी राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी आज बहुमताच्या चाचणीसाठी बोलावलेलं विशेष अधिवेशन रद्द केलं आहे. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर आता विरोधी पक्ष नेते असणारे देवेंद्र फडणवीस हे उद्या म्हणजेच शुक्रवारी, १ जुलै रोजी राज्याचे २० वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचं वृत्त सुत्रांनी दिल्याचं ‘इंडिया टुडे’नं म्हटलं आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन भाजपा सरकार स्थापन करणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यास एकनाथ शिंदेंच्या गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ पडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

नक्की वाचा >> मध्यरात्री शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्यात दाखल; महाराष्ट्रात येण्याची घाई न करण्याचा चंद्रकांत पाटलांचा सल्ला, कारण…

भाजपा एकनाथ शिंदे गटातील ३९ शिवसेनेचे आमदार आणि अपक्ष ९ अशा ४८ आमदारांच्या मदतीने सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्न आहे. असं झालं तर एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पद मिळू शकतं. मध्यरात्री सर्व बंडखोर आमदार गोव्यामध्ये दाखल झाले आहेत. २२ जून पाहून हे आमदार गुवाहाटीमधील ‘रेडिसन्स ब्लू’ हॉटेलमध्ये वास्तव्यास होते.

३० जूनच्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर ते काल म्हणजेच २९ जून रोजी गोव्यात दाखल झाले. गोव्याचे मुख्यमंत्री मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास या आमदारांच्या स्वागतासाठी पोहोचले होते. सध्या भाजपाकडे १०६ चे संख्याबळ असून ४८ आमदारांच्या मदतीने भाजपाला बहुमताचा १४५ चा आकडा सहज गाठणं शक्य आहे. “एकनाथ शिंदेंसोबत काम करणार आहोत हे स्पष्टच आहे,” असं पत्रकारांशी बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्याने शिंदेच्या समर्थनावरच फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या गादीवर बसतील असं चित्र दिसत आहे.

नक्की वाचा >> “आज ‘चाणक्य’ लाडू खात असले तरी…”; उद्धव ठाकरेंसाठी दाक्षिणात्य अभिनेत्यानं केलेली पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय

“शपथविधी कधी होईल, त्यावर निर्णय व्हायचा आहे. उद्धव ठाकरे जर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेले नसते, जर त्यांनी हिंदुत्वाची भूमिका धरून ठेवली असती, तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती,” असंही चंद्रकांत पाटील बुधवारी उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर म्हणाले आहेत.  “सरकार बनवण्याचा दावा कधी करणार त्यावर निर्णय व्हायचा बाकी आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीशी बोलून यासंदर्भात निर्णय घेऊ. अजून याबाबत कोणता निर्णय घेतलेला नाही,” असं स्पष्ट करताना चंद्रकांत पाटलांनी आज यासंदर्भात चर्चा केली जाईल असे संकेत दिलेत.

एकीकडे भाजपाने सत्तास्थापनेसाठी वेगवान हलचाली सुरु केल्या असल्या तरी दुसरीकडे शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांचा कायदेशीर मुद्दा कायम आहे. सत्ताबदल झाल्यावरही शिवसेना व शिंदे गटात कायदेशीर लढाई कायम राहणार आहे. विश्वासदर्शक ठरावावर मतदान झाले असते तर शिवसेना व शिंदे गटात कायदेशीर मुद्दा पुढे आला असता. कारण शिवसेना विधिमंडळ पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी ठरावाच्या बाजूने मतदान करावे, असा पक्षादेश काढला होता. शिंदे गटाने प्रभू हे प्रतोद नाहीत तर गोगावले हे प्रतोद असल्याचा दावा केला होता. विश्वासदर्शक ठरावावरील मतदान टळले असल्याने कायदेशीर मुद्दा उद्या उद्भभणार नाही.

नक्की वाचा >> “प्रत्येक प्रसंगात राज ठाकरेंचं नुकसान करणाऱ्या, त्यांची माणसं फोडणाऱ्या, त्यांच्याविरोधात द्वेषाचं राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरेंबद्दल…”

विधानसभा उपाध्यक्षांच्या विरोधातील अविश्वास ठराव किंवा नवीन सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील मतदानाच्या वेळी पुन्हा शिवसेना आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये पक्षादेशाचा मुद्दा पुढे येऊ शकतो. नवीन अध्यक्षाची निवड करून शिंदे गटाच्या आमदारांच्या गटाला मान्यता देण्याची खेळी भाजपकडून केली जाईल. पण तोपर्यंत शिवसेना व शिंदे गटात कायदेशीर लढाई सुरूच राहिल असं दिसत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fadnavis may take oath as cm july first shinde could bag dy cm post scsg

ताज्या बातम्या