आदिवासींना न दुखावता धनगर समाजाला न्याय देण्याची भूमिका- पृथ्वीराज चव्हाण

धनगर आणि आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला राजकीय रंग चढत असल्याबाबत कमालीची नाराजी व्यक्त करताना, राजकारण करू नका, थोडा वेळ द्या, कायद्याच्या चौकटीत सन्मानपूर्वक आरक्षण घ्या, असा सबुरीचा सल्ला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.

धनगर आणि आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला राजकीय रंग चढत असल्याबाबत कमालीची नाराजी व्यक्त करताना, राजकारण करू नका, थोडा वेळ द्या, कायद्याच्या चौकटीत सन्मानपूर्वक आरक्षण घ्या, असा सबुरीचा सल्ला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. आदिवासींना न दुखावता धनगर समाजाला न्याय देण्याची भूमिका असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
काँग्रेसचे सहयोगी माणचे अपक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी आज येथील विश्रामगृहावर धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून दिली. या शिष्टमंडळात खटाव, माण, खंडाळा आदी तालुक्यांतील धनगर समाजातील कार्यकर्त्यांचा समावेश होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार आनंदराव पाटील हे या चर्चेवेळी उपस्थित होते. 
धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. काँग्रेसच्या एकाही जिल्हाध्यक्षाने धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिलेला नसून, मुख्यमंत्री व काँग्रेस पक्षाचाच तुमच्या आरक्षणाला विरोध असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सांगत असल्याबाबत शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना तेढले. आरक्षणाच्या निर्णयावर तत्काळ सकारात्मक निर्णय झाला नाहीतर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीला पराभूत करण्याची भूमिका धनगर समाज घेणार असल्याचा इशारा या शिष्टमंडळाने दिला. यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी कमालीची नाराजी व्यक्त केली. काल धनगर समाजाच्या नेत्यांशी आपण अडीचतीन तास चर्चेच्या फेऱ्या केल्या. या प्रश्नी अजिबात राजकारण करू नका, कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेऊ, पण भावना भडकवण्याच्या प्रकारापासून लांब रहा, अशी विनंती त्यांनी केली. धनगर व आदिवासी समाजाच्या आरक्षणाची मागणी राजकीय प्रश्न व्हायला लागलीय अशी खंत व्यक्त करून, पण थोडा वेळ द्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी बसून मार्ग काढला जाईल. मुख्यमंत्री स्वत: सर्व निर्णय घेत नसतात, महत्त्वाच्या निर्णयावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करावी लागते. कायदेशीर बाबीही तपासाव्या लागतात असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. धनगर आणि धनगड यातील स्पेलिंग मिस्टेक दुरुस्ती करावी लागेल. राष्ट्रपतींच्या १९५०च्या अध्यादेशात काय म्हटले आहे. शासकीय दप्तरी या समाजाची काय नोंद आहे, हे पाहणे खूप गरजेचे आहे. कोणी काही म्हटले तरी राजपत्र पाहूनच योग्य ते बदल करून निर्णय घ्यावा लागेल. आरक्षणाच्या मागणीसाठी शिष्टमंडळ आज राष्ट्रपती व पंतप्रधानांना भेटायला गेले आहे. पण आरक्षण द्यायला कोणाचेच दुमत नाही, असे चव्हाण म्हणाले. यावर दुमत असण्याचे कारणच नाही. पण राजकारण करू नका, अशी विनंती पतंगराव कदम यांनी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fair role do not hurt tribal when give justice to dhangar community cm