मध्यप्रदेशातील खांडवा कारागृहातून पसार व बंदी घालण्यात आलेल्या सीमी संघटनेशी संबंधित जाकेर हुसेन सादिक खान याला नांदेडमधून बनावट नावाने आधारकार्ड मिळाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे बनावट कागदपत्रे देणाऱ्यांवर नांदेड पोलिसांनी कोणतीही कारवाई करण्याचे धाडस दाखवले नाही.
दहशतवादी कृत्यात उघड सहभाग नोंदवणाऱ्या व बंदी घातलेल्या सीमी संघटनेशी संबंधित असलेले महेबूबखान इस्माईल खान, अजमद खान रमजान खान, असलम मोहम्मद अयूब खान, मो. एजाजुद्दीन म. अजिजोद्दीन, जाकेर हुसेन बदरुल हुसेन व महंमद सलीक हे ६ अतिरेकी दीड वर्षांपूर्वी, २०१३ च्या ऑक्टोबरमध्ये खांडवा कारागृहातून पसार झाले होते. खांडवा येथील बॉम्बस्फोट, तसेच देशभरातील वेगवेगळ्या दहशतवादी कारवायांत या सहाजणांचा सहभाग होता. या सहापकी एक जाकेर हुसेन याची सासुरवाडी नांदेडची आहे. पुणे, उत्तर प्रदेशातील बिजूर व बंगळुरू येथे झालेल्या बॉम्बस्फोटात या सहाजणांचा सहभाग असल्याचा संशय एटीएस, तसेच एनआयए या संस्थेला आहे.
देशभरातील सर्व गुप्तचर यंत्रणा या सहाजणांचा शोध घेत आहेत. नांदेड एटीएसने या सहाजणांच्या शोधासाठी सोशल नेटवìकगचा वापर सुरू केला आहे. एकीकडे सर्व यंत्रणा या सहाजणांचा शोध घेत असताना दुसरीकडे या प्रकरणातला एक आरोपी जाकेर हुसेन याला नांदेडमधून बनावट आधारकार्ड मिळाल्याची माहिती हाती आली आहे. २०११ मध्ये एका नगरसेवकाच्या शिफारशीवरून हे आधारकार्ड देण्यात आले. संबंधित नगरसेवकाने महंमद जाकेर याचे नाव सादिक असल्याचे सांगत आपण त्यांना ओळखतो, असे प्रमाणपत्र दिल्यानंतरच हे आधारकार्ड देण्यात आले. मध्यप्रदेशातील रत्नलम येथील जिल्हा न्यायालयाने याच बनावट आधारकार्डासंदर्भात सहायक आयुक्त सुधीर इंगोले यांची साक्ष नोंदवली आहे.
जाकेर हुसेन याचे बनावट आधारकार्ड कसे निघाले, त्याला कोण जबाबदार आहे, याची चर्चा सध्या सुरू आहे. नांदेड पोलिसांनाही याची इत्थंभूत माहिती मिळाली आहे. पण बनावट कागदपत्रे तयार करण्यास मदत करणाऱ्या कोणावरही कारवाई करण्याचे धाडस नांदेड पोलिसांनी दाखवले नाही. अशा प्रकारची किती बनावट आधारकार्ड तयार झाली, याची चिंता एटीएसच्या अधिकाऱ्यांना सतावत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fake aadhar card to terrorist in nanded
First published on: 24-02-2015 at 01:10 IST