उपासमार झालेला जखमी बिबटय़ा वन खात्याच्या पिंज-यात गतप्राण

उपासमारीमुळे जीव मेटाकुटीला येऊन भक्ष्याच्या शोधार्थ भरकटलेला बिबटय़ा पाच तासांच्या थरारनाटय़ानंतर वन विभागाच्या पिंजऱ्यातच गतप्राण झाल्याची घटना काल गुरुवारी जागतिक पर्यावरणदिनी पाटण तालुक्यातील गारवडे येथे घडली.

उपासमारीमुळे जीव मेटाकुटीला येऊन भक्ष्याच्या शोधार्थ भरकटलेला बिबटय़ा पाच तासांच्या थरारनाटय़ानंतर वन विभागाच्या पिंजऱ्यातच गतप्राण झाल्याची घटना काल गुरुवारी जागतिक पर्यावरणदिनी पाटण तालुक्यातील गारवडे येथे घडली. या घटनेने जंगली प्राण्यांची उपासमारीमुळे होणारी स्थिती पुन्हा ऐरणीवर आली असून, मनुष्याने त्यांचे भक्ष्य फस्त केल्यानेच हे दुर्दैवी प्रकार घडत असल्याची शोकांतिका पर्यावरण व वन्यजीवप्रेमी मंडळींनी व्यक्त केली आहे.
गारवडे येथील तांबुळकी नावाच्या शिवारात बिबटय़ा येत असल्याचे शिवाजी कांबळे या वनमजुराच्या निदर्शनास आले. त्याने तत्काळ याबाबतची माहिती ग्रामस्थांना दिली. यावर लोकांनी एकच गर्दी केली. दरम्यान, हा बिबटय़ा संथ गतीने हालचाल करीत होता आणि लोकांच्या गोंगाटामुळे तो निवडुंगीच्या जाळीत बसला. त्याच्या उजव्या खुब्याला जखम झाली असल्याने आणि काही दिवस तो उपाशी राहिल्याने अशक्तपणा आणि खुब्याचे दुखणे यामुळे तो मेटाकुटीला आला होता. दरम्यान, वन अधिकाऱ्यांचे पथक पिंजऱ्यासह येथे दाखल झाले. वन कर्मचाऱ्यांनी बिबटय़ाच्या बाजूने वाघर टाकून पिंजरा लावला. दरम्यान, बिबटय़ाच्या गळय़ाला दोरीचा फास अडकला आणि त्यास जेरबंद करण्यात यश आले. पण सदरचा पिंजरा मिनीडोअर टेम्पोत घालून पाटणच्या दिशेने नेत असताना, गारवडेच्याच भानू नावाच्या शिवाराच्या दिशेने गाडी जात असताना पिंजऱ्याच्या जाळीतून तोंड बाहेर काढून बिबटय़ाने जोरदार मुसंडी मारून दरवाजा उघडला व बिबटय़ाने धूम ठोकली. धूम ठोकून उसाच्या फडाचा त्याने आधार घेतला. या वेळी दोरीचा फास टाकून त्यास जेरबंद करण्यात आले, मात्र मानेला फास जोराने आवळल्यामुळे बिबटय़ा बेशुद्धावस्थेत गेला. या वेळी वन खात्याच्या पथकाने त्यास पुन्हा पिंजऱ्यात कैद केले. आणि पाटणच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले, मात्र वाटेतच बिबटय़ाने प्राण सोडले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Famished injured leopard died in cage of forest dept

ताज्या बातम्या