शेतरस्ता वापरता न येण्याबद्दल तहसिलदारांकडे वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे लातूरमध्ये एका चिडलेल्या शेतकऱयाने सोमवारी चाकूने थेट तहसिलदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तहसिलदार महेश शेवाळे यांच्या हातातील दैनंदिनीवर चाकूचा घाव बसल्याने ते बचावले. पोलीसांनी हल्ला करणाऱया शेतकऱयाला ताब्यात घेतले आहे. धोंडीराम भद्रे (७४) असे या शेतकऱयाचे नाव आहे.
स्वतःच्या शेताकडे जाण्यासाठी असलेला सामायिक रस्ता स्थानिक लोक वापरू देत नसल्यामुळे भद्रे यांनी सातत्याने तहसिलदारांकडे तक्रार केली होती. गेली सात वर्षे या तक्रारीचा पाठपुरावा ते करीत होते. मात्र, तहसिलदारांकडून त्यांना कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे भद्रे त्रस्त झाले होते. सोमवारी सकाळी शेवाळे कार्यालयात आल्यावर आपल्या गाडीतून उतरत असतानाच त्यांच्यावर भद्रे यांनी चाकूने हल्ला केला. शेवाळेंच्या हातातील दैनंदिनीवर चाकूचा घाव बसल्याने त्यांना मोठी इजा झाली नाही. पोलीसांनी याप्रकरणी गु्न्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.