शेततळ्यात उडी घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

अवकाळी पावसात डाळिंब बागेचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे हतबल झालेल्या सटाणा तालुक्यातील शेतकऱ्याने मंगळवारी दुपारी शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली.

अवकाळी पावसात डाळिंब बागेचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे हतबल झालेल्या सटाणा तालुक्यातील शेतकऱ्याने मंगळवारी दुपारी शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली. नुकसानभरपाई जाहीर होऊनही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून या तालुक्यातील डाळिंब उत्पादकाने आत्महत्या करण्याची ही तिसरी घटना आहे.
सटाणा तालुक्यातील पिंगळवाडे गावात हा प्रकार घडला. छबू मोहन भामरे (६२) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. डाळिंब बाग फुलविण्यासाठी त्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून साडेसात लाख रुपये, तर काही नातेवाइकांकडून दीड लाख रुपये कर्जाऊ घेतले होते. चार आठवडय़ांपूर्वी अवकाळी पाऊस व गारपिटीत त्यांची बाग भुईसपाट झाली. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने ते हतबल झाले होते. भामरे यांच्या मुलाचे लग्न २४ एप्रिलला होते. डाळिंबाचे उत्पन्न हातून गेल्यामुळे डोक्यावरील कर्ज कसे फेडणार, या विवंचनेत त्यांनी मंगळवारी बागेतील शेततळ्यात उडी मारून आपली जीवनयात्रा संपविली. कुटुंबीय व ग्रामस्थांनी शोध घेतला असता हा प्रकार निदर्शनास आला. भामरे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व चार मुली असा परिवार आहे. सटाणा तालुक्यात काही दिवसांपूर्वी दरेगाव व बिलपुरी गावातील दोन डाळिंब उत्पादकांनी आत्महत्या केली होती. तालुक्यातील आत्महत्येची ही तिसरी घटना आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Farmer commits suicide

ताज्या बातम्या