राहाता : सादतपूर येथील शेतकरी पती-पत्नीचा काल, गुरुवारी रात्री एकाच दिवशी गूढ मृत्यू झाला. पत्नीचा मृतदेह शेततळ्यात, तर पतीचा मृतदेह घरात संशयास्पदरीत्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. घातपात, की आत्महत्या याचे कोडे गुलदस्तात आहे. याबाबत आश्वी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

रेवजी मुरलीधर गायकर (वय ६०) आणि त्यांची पत्नी नंदा गायकर (वय ५५) अशी मृतांची नावे आहेत. रेवजी गायकर हे शिक्षण संस्थेत नोकरीस होते. पत्नी, मुलगा, तीन मुली असे त्यांचे कुटुंब. चारही मुलांचा विवाह झाला. मुली सासरी, तर मुलगा नोकरीसाठी छत्रपती संभाजीनगरला. घरी पती-पत्नी दोघेच. रेवजी यांनी तीन वर्षे आधीच स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. शेती आणि निवृत्तिवेतन यावर उदरनिर्वाह सुरू होता.

निमगावजाळी (ता. संगमनेर) येथील विवाहित मुलीने काल सकाळपासून अनेकदा आई-वडिलांशी मोबाइलवर संपर्काचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. जवळच राहणारा चुलतभाऊ रेवजी यांच्या घरी गेला असता, काहीच प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा उघडून बघितले असता, रेवजी यांचा मृतदेह जमिनीवर पडलेला आणि तोंडातून फेस आलेल्या स्थितीत आढळला. तर, पत्नी नंदा यांचा मृतदेह घराजवळच्या शेततळ्यात आढळला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर प्रवरा रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन झाले. रात्री उशिरा दोन्ही मृतदेहांवर गोगलगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने गोगलगावमध्ये शोककळा पसरली आहे. रेवजी व नंदा यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. रेवजी यांच्या तोंडातून फेस आल्याचे दिसून आल्याने त्यांनी विष प्राशन केले, की त्यांना ते कोणी पाजले; तसेच नंदा यांचा मृतदेह शेततळ्यात आढळल्याने त्या पाय घसरून पडल्या, की त्यांचाही घातपात झाला, याचा तपास आश्वी पोलीस करीत आहेत.