गेल्या काही दिवसांपासून ठराविक ठिकाणीच पाऊस पडत असून, या पावसामुळे कागदोपत्री एकूण पावसाची सरासरी वाढत असली तरी पाऊस सर्वत्र समान नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांवर पदोपदी विविध ठिकाणी अन्याय होतो. सरकारकडून होत असलेला अन्याय तो सहन करत असताना या वर्षी तरी निसर्गराजा न्याय देईल या अपेक्षेत असणाऱ्या शेतकऱ्याला असमान पावसामुळे चांगलाच फटका बसतो आहे.
या वर्षी मृग नक्षत्रात पावसाने दोन दिवस हजेरी लावली. काही ठिकाणी चांगला पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली. औराद, गंगापूर, हटकरवाडी, निटूर, कासार बालकुंदा अशा गावांत मागील आठवडय़ात जोरदार पाऊस झाला. जिल्हय़ात काही ठिकाणीच ढग उतरत आहेत. एखाद्या शिवारावर पाऊस होतो व दुसरा शिवार कोरडा राहतो. ज्या शिवारात पाऊस झाला तो अतिशय मोठा असतो, तर दुसरीकडे जमीन ओलीही झालेली नसते. जिल्हय़ात दहा तालुक्यांतील ५३ मंडळांत पर्जन्यमापक यंत्र आहेत, मात्र गावांची संख्या ९००पेक्षा अधिक असल्यामुळे १८ गावांत एक याप्रमाणे पर्जन्यमापक यंत्रणा आहे. ही यंत्रणा तोकडी असल्यामुळे सरकारदरबारी होणारी पावसाची नोंद व प्रत्यक्ष पाऊस यात मोठी तफावत असते.
निलंगा तालुक्यातील औराद मंडळात एका दिवशी दीड तासात ९४ मिमी पाऊस झाला. या पावसाने दाणादाण उडवून दिली. त्या परिसरात आता शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागत आहे. ज्यांचे पेरलेले उगवले होते ते वाहून गेले अन् ज्यांचे उगवायचे होते त्यावर धालपी बसल्यामुळे ते उगवणे शक्य नाही, म्हणून दुबार पेरणी करावी लागत आहे. जमिनीत पेरणीयोग्य ओल आहे म्हणून ज्या शेतकऱ्यांनी पेरणीचे धाडस केले. अशा काही भागात नंतर एक थेंबही पाऊस झाला नाही. रोज कडक ऊन असल्यामुळे जमिनीतील ओलावा झपाटय़ाने कमी होतो आहे. त्यामुळे पीक दुबार धरू लागली आहेत.
जिल्हय़ात आतापर्यंत सरासरी ३० टक्के पेरण्या झाल्या आहेत. हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे, मात्र फारसा पाऊस होत असल्याचे चित्र नाही. सोमवारी सायंकाळी औसा तालुक्यातील किल्लारी ४२ मिमी, लामजना १६, मातोळा १०, अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद १० व निलंगा तालुक्यातील मदनसुरी येथे २७ मिमी पाऊस झाला.
मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्हय़ात सरासरी २.८५ मिमी पाऊस झाला. यामुळे एकूण सरासरी १५०.७७ मिमीवर पोहोचली. सर्वाधिक पाऊस चाकूर तालुक्यात २०२.८० मिमी, तर सर्वात कमी पाऊस रेणापूर तालुक्यात १०३.३४ मिमी झाला. सोमवारचा पाऊस औसा तालुक्यात ११.१४, अहमदपूर तालुक्यात ७.१६, तर निलंगा तालुक्यात ५.१२ मिमीइतका झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer in trouble again due to rain inequality
First published on: 29-06-2016 at 00:19 IST