हिंगोली : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेकडो हेक्टर वरील पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांनी आता ‘पीक पाहणी’ ॲपद्वारे ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या ॲपमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. डिजिटल क्रॉप सर्वे प्रकल्पांतर्गत ई-पीक पाहणी प्रक्रिया सुधारित मोबाईलच्या माध्यमातून राबविली जात आहे. जिल्हात ४ लाख २५ हजार २१२ एकूण पीक पाहणी करावयाच्या मालकीच्या भूखंडाची संख्या आहे. परंतु, मोबाईल ॲप चालत नसल्याने मोजणी कशी करावी, असा प्रश्न निर्माण होत आहे.

राज्यातील शेतीचे अचूक आणि डिजिटल रेकॉर्ड ठेवण्यासाठी डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपच्या मदतीने शेतकरी स्वतःहून आपल्या शेतातील पिकांची नोंदणी करू शकतात. ही माहिती थेट सरकारी विदा विभागात जोडली जाते. १ ऑगस्टपासून शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीसाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना, नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान भरपाई, किमान आधारभूत किंमत अंतर्गत हमी दराने विक्री, पीक कर्ज सुविधा व विविध योजनांसाठी ई-पीक पाहणी आवश्यक आहे. अँग्रीस्टॅक अंतर्गत शासकीय योजना व अनुदान आदींसाठी ई-पीक पाहणी आवश्यक आहे. त्यामुळे शेतकरी स्वतःहून ई-पीक पाहणीला पसंती देत असले तरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. मात्र, मोबाइलमध्ये तांत्रिक अडचणी येऊ लागल्या आहेत. कधीकधी दोन दिवसही ॲप चालत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.