अमरावती : विदर्भातील बाजारात सध्या कापसाला उच्चांकी दर मिळत असून सूत, कापडाला युरोप अमेरिकेत चांगली मागणी असल्याने दरवाढ झाली आहे. विदर्भातील अनेक बाजारांमध्ये कापसाचे दर प्रतिक्विंटल नऊ हजारापर्यंत पोहचले आहेत. पण, कापसाची आवक घटली आहे.

यंदा सुरुवातीपासून खासगी बाजारात कापसाला समाधानकारक भाव मिळत आहे. दरम्यान, गुरुवारी शहरातील खासगी बाजारात कापूस प्रतििक्वटल ८ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात आला आहे. खासगी बाजारात कापसाला मिळालेला दर हा यंदाच्या हंगामातील सर्वोच्च दर असल्याचे कापूस बाजारातील सूत्रांनी सांगितले. यंदा भाव समाधानकारक असला तरीही  कापसाच्या उत्पादनात मात्र प्रचंड घट आली आहे.

कापूस हे विदर्भातील खरीपातील प्रमुख पीक आहे. यावर्षी मात्र खरीपाच्या सुरुवातीपासून अतिपावसाने कापसाला फटका बसला आहे. पावसातून कसेबसे कापसाचे पीक सावरत नाही तर बहुतांश भागात कपाशीवर बोंडअळीने आक्रमण केले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना तर पहिल्या किंवा दुसऱ्या वेचणीनंतरच कपाशी काढावी लागली आहे. अमरावतीच्या खासगी बाजारात दरदिवशी सरासरी तीन ते साडेतीन हजार िक्वटलची आवक सुरू आहे.

कापसाला बाजारात प्रथमच एवढा चांगला भाव मिळत असून पुढे या दरात अजून तेजी येण्याची शक्यता आहे. प्रारंभीपासूनच कापसाचे दर हे चढे असल्याने पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांना प्रतििक्वटल सात हजार ३०० रुपयांचा दर देण्यात आला होता. दिवाळीनंतर या दरात वाढ होऊन प्रतििक्वटल आठ हजार रुपयांवर पोहोचले होते. दरम्यान, आठवडय़ाच्या सुरुवातीला या दरांनी अचानक उसळी घेतली.

अवकाळी पाऊस आणि बोंडअळीचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादनाला मोठा फटका बसलेला आहे. कॅाटन असोसिएशनने यंदा ३६० लाख टनाचे उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. पण प्रत्यक्षात ३३० लाख टनापर्यंतही उत्पादन झाले नाही. शिवाय देशातील सूतगिरण्या आणि कापड उद्योगामध्ये कापसाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे.

उद्योगांची वाढलेली मागणी आणि कमी पुरवठा यामुळे बाजारात कापसाच्या दरात सुधारणा झाली.  देशातील सूतगिरण्या आणि कापड उद्योगाचा कापूस वापर वाढल्याने मागणी आहे, पण बाजारात आवक कमी आहे. शेतकरी चांगल्या दराच्या अपेक्षेने कमी कापूस विक्रीस आणत आहेत, असे जाणकारांनी सांगितले.

ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी घटली होती. तर जागतिक पातळीवरील परिणाम थेट स्थानिक पातळीवरील सूतगिरण्यांवरही झाला होता. येथील गिरण्यांनीदेखील उत्पादन क्षमता कमी केली होती. याचा परिणाम कापसाच्या दरावर झाला होता. पण, आता कापूस, रुई, सूत आणि सरकीच्या दरात गेल्या तीन दिवसांत आश्वासक वाढ दिसत आहे.