मोदी सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय तातडीने घेतला आहे. या निर्णयाविरोधात नाशिकच्या शेतकऱ्यांनी आता आंदोलन पुकारलं आहे. मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोकोही करण्यात आला आहे. नाशिकमधील देवळातल्या उमराणे या ठिकाणचे कांदा उत्पादक चांगलेच संतापले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले. संतप्त शेतकऱ्यांनी एकच मागणी केली आहे की लवकरात लवकर ही निर्यातबंदी उठवावी. केंद्र सरकारने तातडीने अमलबजावणी करत निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा निषेध करत शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा- आता आम्ही कांदा विकायचा कुठे? निर्यातबंदीनंतर शेतकऱ्यांचा मोदी सरकारला उद्विग्न सवाल

केंद्र सरकारने घेतलेला कांदा निर्यातबंदीचा निर्णय हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे, त्यामुळे ही निर्यातबंदी मोदी सरकारने मागे घ्यावी अशी मागणी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्यासोबत आहे. आम्ही आमच्यातर्फे आजच केंद्राला निर्यातबंदी मागे घेण्याची विनंती करतो आहोत असंही दादा भुसे यांनी स्पष्ट केलं आहे. कुणाचीही मागणी नसताना केंद्र सरकारने ही निर्यातबंदी जाहीर केली आहे. हा निर्णय कांदा उत्पादकांवर अन्याय करणारा आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- केंद्राच्या निर्णयामुळे कांद्याचा खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून भारताच्या प्रतिमेला मोठा धक्का : शरद पवार

आज सकाळीच या निर्णयाविरोधात नाशिकच्या शेतकऱ्यांनी निर्यातबंदीच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. केंद्र सरकारने तातडीच्या अमलबजावणीसह हा निर्णय घेतला खरा मात्र सध्याच्या घडीला कांदा हा बाजारात मोठ्या प्रमाणावर येतो आहे. कारण कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर झालं आहे. अशा परिस्थितीत निर्यातबंदीचा निर्णय घेतला गेल्यानंतर आम्ही आमच्याकडे उत्पादन झालेला कांदा साठवायचा कसा आणि विकायचा कुठे? असे दोन संतप्त प्रश्न या शेतकऱ्यांनी मोदी सरकारला विचारले आहेत. एवढंच नाही तर आता आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन करताना ही निर्यातबंदी तातडीने मागे घ्यावी अशी मागणी मोदी सरकारकडे केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers in nashik stage protest against central govts decision to ban the export of onions scj
First published on: 15-09-2020 at 15:02 IST