रायगड जिल्ह्य़ातील शेतकरी आता कंपनीचे मालक होणार आहेत. अलिबाग, पेण, माणगाव आणि खालापूर तालुक्यांतील शेतकरी गटांच्या माध्यमातून कृषी उत्पादक कंपन्यांची स्थापना केली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या मालासाठी मोठे दालन उपलब्ध होऊ शकणार आहे.
एकटय़ा शेतकऱ्यांच्या प्रयत्नापेक्षा गटातील सर्व सदस्य शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे फायदा होतो व गटांनी शेतीसही अनेक क्षेत्रामध्ये यशस्वीपणे कामे करून सभासदांची आíथक स्थिती सुधारण्यास मदत होते. ही बाब लक्षात घेऊन आता बचत गटाच्या धर्तीवर शेतकरी उत्पादक गटांची निर्मिती व त्यांची क्षमता बांधणी करून उत्पादक संघ कंपनीमध्ये रूपांतर करण्याचे काम महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पामार्फत निश्चित करण्यात आले आहे.     
बाजारपेठेतील असणारी मध्यस्थांची मोठी साखळी व त्यांची एकाधिकारशाही मोडीत काढणे हा यामागचा मूळ उद्देश आहे. शेतकऱ्यांकडील कमी प्रमाणात असणारा उत्पादित शेतमाल, शेतीसाठी आवश्यक सुविधा व तंत्रज्ञानाचा अभाव यामुळे शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होते. यासाठी महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपनीची स्थापना करून त्यांना शेतकरी सामुदायिक सुविधा केंद्र उभारणीकरिता आíथक साहाय्य दिले जाणार आहे.
शेतकरी सामुदायिक सुविधा केंद्रांतर्गत उत्पादक कंपन्यांनी गावस्तरावर मूलभूत सुविधा चाळणी यंत्र, प्रतवारी मशीन, उत्पादित मालाचे पॅकिंग इत्यादी बाबींचा अवलंब करून उत्पादित शेतमालास योग्य भाव मिळून गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शेतमालाची उत्पादकता या माध्यमातून केली जाणार आहे.  या प्रकल्पांतर्गत ४०० उत्पादक कंपन्यांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट असून यापकी २०० कंपन्या या धान्य-तेलबिया व २०० फळे-भाजीपाला या प्रकारच्या असतील तर प्रत्येक जिल्हानिहाय १४ उत्पादक कंपन्यांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट असून यापकी ७ कंपन्या या धान्य-तेलबिया व ७ फळे-भाजीपाला या प्रकारच्या असतील. उत्पादक कंपनी भारतीय कंपनी कायदा १९५६ नुसार नोंदणीकृत असल्याने त्याला कायदेशीर दर्जा असणार आहे.
रायगड जिल्ह्य़ातील पेण, अलिबाग तालुक्यातील शेतकऱ्यांनी बचत गटाच्या माध्यमातून थेट शेतमाल विक्री योजना यापूर्वी राबविली होती. यात तोंडली, कारली, काकडी, दुधी, वाल व इतर भाजीपाला पनवेल शहरातील सोसायटय़ांमध्ये थेट विक्री केली जात होती. याला चांगला प्रतिसादही मिळाला होता आणि शेतकऱ्यांचा फायदाही झाला होता. त्यामुळे आता शेतकरी उत्पादन कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आíथक सक्षमीकरणाची नवी दालने उघडण्याची शक्यता आहे. अलिबाग, पेण, माणगाव आणि खालापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी प्रकल्प संचालक आत्मा रायगड यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers in raigad district will be the owner of the company
First published on: 20-01-2015 at 01:34 IST